नाशिक : मालेगाव सभेच्या पंधरा दिवस अगोदर फार वल्गना करत होते, मग मालेगावच्या सभेत यावर ते का नाही बोलले? असा सवाल करत देश पातळीवर, आंतरराष्ट्रीय पातळीवर चौकशी करा, जर या चौकशीत मी दोषी आढळलो, तर संन्यास घेईन, नाहीतर टिवटिव करणाऱ्यांनी संन्यास घ्यावा, असा सज्जड दमच राज्याचे मंत्री दादा भुसे यांनी खासदार संजय राऊत यांचे नाव घेता दिला. 


नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांच्यासह अद्वय हिरे यांच्यावर जोरदार टीका केली. संजय राऊत यांचे ट्वीट आणि अद्वय हिरे यांच्यावरील दाखल गुन्ह्याची पोलखोल यावेळी भुसे यांनी केली. संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांचे खंडन करत आताच्या आता चौकशी लावा, दोषी आढळलो तर संन्यास घेईल अथवा त्यांनी संन्यास घ्यावा असे इशारा यावेळी भुसे यांनी दिला. 


संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी ट्वीट करत दादा भुसे यांच्या चौकशीची मागणी केली होती. त्यावर दादा भुसे यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. दादा भुसे म्हणाले की, संजय राऊत हे मालेगाव सभेच्या पंधरा दिवस अगोदर फार वल्गना करत होते, मग मालेगावच्या सभेत का नाही बोलले? असा सवाल दादा भुसे यांनी केला.  तसेच काही दिवसांनी गिरणा कारखान्याची बैठक होणार आहे. सदर मिटींगला टिवटिव करणाऱ्या लोकांना देखील बोलवणार आहे. यानंतर हवं तर देश पातळीवर, आंतरराष्ट्रीय पातळीवर चौकशी करा, जर या चौकशीत मी दोषी आढळलो, तर संन्यास घेईल. नाहीतर टिवटिव करणाऱ्यांनी संन्यास घ्यावा, असा सज्जड दमच दादा भुसे यांनी यावेळी भरला. 


दादा भूसे पुढे म्हणाले की, स्थानिक अकराशे सभासद शेतकऱ्यांकडून 1 कोटी 70 की 80 लाख रुपये जमा झाले. दुर्दैवाने आता टीका करणाऱ्या लोकांनी त्यावेळी इतक्या कमी पैशात कारखाना मिळेल का, असा प्रश्न विचारला होता. त्यावेळी छगन भुजबळ यांच्या आर्मस्ट्राँग कंपनीच्या माध्यमातून हा कारखाना घेण्यात आला. कदाचित तो आकडा 1.78 असेल, तर तो आकडा 178 कोटी असा दाखवण्यात येत आहे. त्यांना मधला पॉइंट दिसत नाही. कारण त्यांना मोठ्या पैशाची सवय झाली. आपण लहान कार्यकर्ते असल्याने अशा गोष्टींवर मालेगावकर लक्ष देत नाही. मात्र जर त्यांनी मालेगावच्या सभेत एक शब्दही उच्चारला असता, तर लगेच दुसऱ्या दिवशी मानहानीचा दावा ठोकला असता आणि गुन्हा देखील दाखल केला असता. माझं तर त्यांना आवाहन आहे की, चौकशी कराच, असं आवाहन दादा भुसे यांनी संजय राऊत यांना दिलं आहे. 


आज ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांच्यावर हल्ला झाला. यावेळी उद्धव ठाकरेंसह रश्मी ठाकरे यांनी स्वतः जाऊन भेट घेतली. त्यानंतरच्या पत्रकार परिषद घेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. यावर भुसे म्हणाले की, ठाणे येथे जो प्रकार घडला, यावर निश्चितपणे कारवाई होईल. ठाकरे पहिल्यांदा घराच्या बाहेर पडून कुणाला तरी भेटायला गेले, असेही भुसे म्हणाले. 


अद्वय हिरेंवरही टीकास्त्र


दरम्यान, दादा भुसे यांनी यावेळी काही दिवसांपूर्वी जिल्हा बँकेच्या फसवणूक प्रकरणी अद्वय हिरेंवर नाव न घेता ताशेरे ओढले. ते म्हणाले की, तिथल्या स्थानिक नेत्याने सुरुवातीला ही टिवटिव केली आहे. पुष्पाताई हिरे या मंत्री असताना रेणुका सूत गिरणी नावाने शेअर गोळा करण्यात आले. मात्र या तीस वर्षात मालेगावकरांना सूत गिरणी बघायला मिळाली नाही. या रकमेचे पुढे काय झाले, माहित नाही? तसेच स्थानिक टिवटिववाले जिल्हा बँकेचे पदाधिकारी असताना त्या सूत गिरणीला अडीच कोटी रुपये मंजूर करून घेतले. पुन्हा पाच कोटी, असे साडे सात कोटी बँकेतून काढण्यात आले. ते पैसे त्यांच्या मालकीच्या व्यंकटेश बँकेत वर्ग करण्यात आले आणि दुसऱ्या प्रयोजनासाठी वापरण्यात आले. हा मनी लाँड्रिंगचा प्रयत्न आहे. या साडे सात कोटी पैकी एक रुपया देखील जिल्हा बँकेला परत केला नाही. जवळपास 32 कोटी रुपयांचा घोटाळा असून या लोकांनी तीन चार बँकांची फसवणूक केली आहे. यावर सहकार खाते निश्चितपणे यावर पुढची कारवाई करेल, असा इशाराच अप्रत्यक्ष ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांना दिला आहे.