नाशिक: मुबई पुण्यापाठोपाठ नाशिकसारख्या धार्मिक शहरात ड्रग्स रॅकेट (Nashik Drugs Racket) उघडकीस आल्यानं एकच खळबळ उडाली.  नाशिकच्या पालकमंत्र्यांचे नाव यात जोडले गेल्यानं राजकारणही जोमात सुरु आहे. पोलीस कारवाई (Nashik Police) करत नसल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. तर नाशिकच्या गुन्ह्यात आतापर्यंत दहा जणांना अटक झाल्याची माहिती नाशिक पोलिसांनी दिली आहे. यापुढे शहरातील हुक्का पार्लरवर कारवाई  करण्याची मोहीम उघडली जाणार आहे.


मुबई आणि पुण्यात ड्रग्ज तस्कर धुमाकूळ घालत असतानाच तीर्थक्षेत्र असणाऱ्या नाशिकमध्ये थेट ड्रग्सची निर्मिती सुरू होती. नाशिकरोड पोलीस ठाण्यापासून आठ ते नऊ किलोमीटवर कोट्यवधी रुप्याचे ड्रग्स बनविणारी फॅक्ट्री सुरू असताना नाशिकरोड पोलिसांना त्यांची माहितीच नव्हती. या प्रकरणी पोलीस निरीक्षक देविदास वांजळे यांची कंट्रोलरूम मध्ये बदली करण्यात आली.  


पोलिसांची संयुक्त कारवाई सुरू


मुंबई आणि पुणे दोन्ही शहरातील ड्रग्ज रॅकेटच्या लिंक नाशिकच्या कारखान्याशी जोडली गेल्यानं तिन्ही शहराच्या पोलिसांच्या माध्यमातून आता संयुक्त करवाई केली जात आहे. भूषण पाटील, ललित बलकवडे यांच्यासह 10 आरोपीना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. मुबई आणि पुणे पोलिसांकडून त्याची चौकशी सुरु करण्यात आली आहे. तर  नाशिकच्या वडाळागाव आणि सामनगाव प्रकरणातील इम्तियाज शेख आणि अतिश चौधरी या दोघांना पहाटे अटक करण्यात आली आहे.


ललित पाटील, भूषण पाटील आणि अभिलाष बलकवडे यां त्रिकुटाने डिसेंबर 2022 मध्ये ड्रग्सचा कारखाना सुरु केला आणि तो ऑगस्ट 2023 पर्यंत सुरु होता. नाशिकमध्ये बनवनिण्यात आलेल्या या ड्रग्जची एक ग्रॅमही विक्री नाशिकमध्ये  झाली नाही. त्याची विक्री ही मुंबई आणि पुण्यात केली जात होती. नाशिकमधून मुंबईला ड्रग्ज सप्लाय होत होता अशी माहिती तपासात उघड  झाली आहे. 


राजकारण जोमात


एकीकडे पोलीस तपास सुरु असताना या वरून सुरू झालेलं राजकारणही जोमात आहे. दहा दिवसांत अपेक्षित तपास करण्यात पोलीस अपयशी ठरले असल्याचा आरोप विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला असून पोलीस राजकीय नेते आणि ड्रग्ज तस्कर यांचे लागेबांधे असल्याचा आरोप त्यांनी केला.


नाशिकमध्ये चौकाचौकात ड्रग्ज, गांजा विक्री केली जात असल्याच्या तक्रारी केल्या जात आहे. शहरात अनेक ठिकाणी अनधिकृत हुक्का पार्लर सुरु असून तिथूनही ड्रग्सचा नशा केला जात असल्याचा पोलिसाना संशय आहे. शहरातील हुक्का पार्लरवर यापुढे कारवाई करण्याचा इशारा नाशिक पोलिसांनी दिला आहे. 


ही बातमी वाचा: