नाशिक : एखाद्या गोष्टीची तलफ लागली, तर माणसाला कोणत्याही परिस्थितीत अस्वस्थता येते आणि तलफ भागवल्याशिवय चैन पडत नाही. याचं उदाहरण नाशकात पाहायला मिळालं. खड्ड्यात पडलेल्या आजोबांना सुखरुप बाहेर काढलं, मात्र हॉस्पिटलला जाण्यापूर्वी त्यांना विडीची तलफ लागली होती.


नाशिक जिल्हा रुग्णालयाजवळ इमारतीच्या बांधकामासाठी 20 फूट खोल खड्डा खणण्यात आला आहे. काल रात्री खड्ड्यात एक आजोबा पडले. अग्निशमन दलाने प्रयत्नांची शर्थ करुन सकाळी त्यांना बाहेर काढलं, पण खरी कमाल तर पुढे आहे.

आजोबांना रुग्णालयात नेण्याची धडपड सुरु होती. मात्र आपल्याला दवाखान्यात नेण्याआधी आणि कुठल्याही औषधाआधी बिडी द्या, असा आग्रह आजोबांनी धरला.

आजोबांचा हट्ट ऐकून उपस्थितांना हसावं की रडावं, हे समजेना. त्यामुळे बचावकार्यानंतर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना बिडीसाठी शोधाशोध करावी लागली. अखेर 'बीडी जलैले' झाल्यानंतर त्यांच्या 'जिगरमा थंडक' पडली.

दोन झुरके मारल्यावर आजोबांना तरतरी आली आणि त्यांच्या 'बिडीप्रेमा'चे सुरस किस्से परिसरात रंगू लागले.