Nashik News Update : नाशिक जिल्ह्यातील मळे परिसरात बिबट्याचे हल्ले सुरूच आहेत. दिंडोरी तालुक्यातील बिबट्याने एका दहा वर्षीय बालकावर हल्ला केलाय. या हल्ल्यात बालकाचा मृत्यू झालाय. करण तिवारी असे मृत बालकाचे नाव आहे.


नाशिक जिल्ह्याताली दिंडोरी तालुक्यातील निळवंडी परिसरात बिबट्याने करण याच्यावर हल्ला केला. यात त्याचा मृत्यू झालाय. बालकाचा मृत्यू  झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. 


दिंडोरी तालुक्यात मळे परिसर आल्याने बिबट्याचा वावर वाढला आहे. अनेक गावांमध्ये बिबट्यांची दहशत निर्माण झाली असून बिबट्याच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सोमवारी सायंकाळी इयत्ता चौथीत शिकणारा करण हा  शाळा सुटल्यानंतर  आपल्या मित्रांसोबत वस्तीवर निघाला होता. यावेळी इमानवाडी परिसरात वाघाड कॅनॉल जवळून जात असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. बिबट्याने करणला झुडपात नेले. यावेळी इतर विद्यार्थ्यांची भीतीने गाळण उडाली. मात्र त्याही अवस्थेत धीर न सोडता त्यांनी मदतीसाठी आरडा ओरड केली.  


यावेळी आजूबाजूला असणाऱ्या शेतकऱ्यांनी तातडीने धाव घेत करणला बिबट्याच्या तावडीतून सोडवले. मात्र करण बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
 
घटनेची माहिती मिळताच वनविभागसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. यावेळी ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत वनविभागाला धारेवर धरले. तसेच पिंजरा लावण्याची मागणी केली. त्यामुळे नागरिकांच्या मागणीनुसार बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात येणार आहे. 


दिंडोरी तालुक्यात बिबट्याची दहशत
दिंडोरी तालुक्यातील म्हेंळुस्के, लखमापूर, परमोरी येथे बालकांवर बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना यापूर्वी देखील घडल्या आहेत. मात्र बिबट्याकडून होणाऱ्या हल्ल्याच्या घटना परिसरातील नागरिकांना नित्याच्या झाल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांना शेतावर जाणे देखील धोक्याचे वाटू लागले आहे. त्यातच आता शाळा सुरू झाल्याने मुलांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.