नाशिक : देव तारी त्याला कोण मारी, अशी मराठीमध्ये म्हण आहे. याचाच प्रत्यय नाशिकमध्ये आला. तिसऱ्या मजल्यावरुन कोसळूनही तीन वर्षांचा चिमुकला सुखरुप बचावला. विशेष म्हणजे एवढ्या उंचावरुन कोसळून देखील त्याला कोणतीही दुखापत झाली नाही. डॉक्टरांनी तपासणी करुन त्याला घरी सोडलं.


नाशिक जिल्ह्यातील ओझर या गावात तीन वर्षांचा मुलगा तिसऱ्या मजल्यावरुन थेट खाली रस्त्यावर कोसळला, मात्र त्यास कुठलीही दुखापत झाली नसून तो सुखरुप बचावला आहे. काळजाचा ठोका चुकवणारी ही दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. ओझरच्या चांदनी चौकातील अलसना अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या फेयजान सद्दाम शेख या तीन वर्षांच्या मुलासोबत गुरुवारी (24 मार्चा) दुपारी ही घटना घडली. 


भरधाव एक्सप्रेस आली अन् तेवढ्यात...; पोलिसांच्या धाडसामुळं जीव द्यायला निघालेल्या युवकाचे प्राण वाचले


फेयजानची आई घरात काम करत असतानाच तो खेळता खेळता घराच्या बाल्कनीत गेला आणि त्याचा तोल गेल्याने तो थेट खाली रस्त्यावर पडला. याच वेळी रस्त्यावरुन पायी जाणाऱ्या एका इसमाने त्याला उचललं. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने इथे गोळा झाले. त्याला तात्काळ जवळच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आला. फेयजानला कुठलीही इजा झाली नसल्याचं डॉक्टरांनी तपासणीनंतर सांगितलं. केवळ दैव बलवत्तर म्हणून फेयजन तिसऱ्या मजल्यावरुन खाली कोसळूनही आश्चर्यकारकरित्या सुखरुप बचावला आहे. 


चिमुकला तिसऱ्या मजल्यावरुन पडला म्हणजे रक्ताच्या थारोळ्यात असावा किंवा त्याला गंभीर दुखापत झाली असावी, असं वाटत होतं. परंतु तसं काहीही झालं नाही. मुलाला ना गंभीर दुखापत झाली ना त्याला खरचटलं. खाली पडल्यावर एका इसमाने त्याला तातडीने उचललं आणि बाजूला नेलं. तिथे काही लोक जमा झाले आणि मुलाला तातडीने रुग्णालयात नेलं. तपासणीअंती मुलगा सुखरुप असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आणि सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास सोडला.


दरम्यान बाल्कनीतून पडून लहान मुलांचे अपघात झाल्याच्या अनेक घटना गेल्या काही महिन्यांपासून समोर येत आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष देण्याची गरज आहे.


VIDEO : मुंबईत चौथ्या मजल्यावरुन पडूनही चिमुकला बचावला