नाशिक : नाशिकच्या  (Nashik) सप्तश्रृंगी देवीचं  (Saptshrungi Devi)  मंदिर घटस्थापनेला  खुलं होणार आहे.  मागील 45 दिवसापासून मंदिर दर्शनासाठी बंद आहे. उद्यापासून  भाविकांसाठी मंदिर खुले होणार होते परंतु अद्यापही काही काम अपूर्ण असल्याने मंदिर खुले होण्याचा मुहूर्त 21 दिवस पुढे ढकलला आहे. गेल्या काही दिवसांपासून बंद असलेले नाशिक जिल्ह्यातील वणी येथील सप्तश्रृंगी देवीचे मंदिर अखेर खुले होणार आहे. त्यामुळे भाविकांना दर्शन घेता येणार असल्याची माहिती सप्तश्रृंगी देवी संस्थानच्या वतीने देण्यात आली आहे.


नाशिकच्या  (Nashik) सप्तशृंगी गडावर (Saptshrungi Gad) काही दिवसांपूर्वी ढगफुटी सदृश्य पावसाने हजेरी लावल्याने मोठा गोंधळ उडाला होता. यावेळी मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांवर पुराचा लोंढा आल्याने भाविक जखमी झाले होते. या सर्व पार्श्वभूमीवर सप्तशृंगी देवी मंदिर पुढील दीड महिना बंद ठेवण्यात आले होते. शिवाय मंदिराच्या डागडुजी साठी भाविकांना दर्शनासाठी मज्जाव करण्यात आला होता. मात्र आता भाविकांना आता मनसोक्त दर्शन घेता येणार आहे. 


साडेतीन शक्तीपिठांपैकी आद्य शक्तीपिठ असलेले वणीचे सप्तश्रृंगी देवी मंदिर मागील दीड महिन्यांपासून बंद आहे. सप्तश्रृंगीच्या या नांदूरी गडावर साधरणतः 600 छोटे मोठे व्यावसायिक असून येणाऱ्या भाविकांवरच येथीले सर्व उद्योगधंदे अवलंबून असल्याने गावचे अर्थकारण पूर्णतः ठप्प झाले आहे. फुलविक्रेते, पूजासाहित्य-प्रसाद विक्रेते, हॉटेल्स-लॉज, टॅक्सीचालक अशा सर्वांचाच यात समावेश आहे. अनेक दिवसांपासून मूर्ती संवर्धनासाठी बंद असलेले मंदिरात लवकरच भाविकांसाठी खुले होणार आहे.  सप्तशृंगी येथील भगवती मंदिर हे सोमवारी 26 सप्टेंबरपासून दर्शनासाठी खुले होणार असल्याची माहिती सप्तशृंगी निवासिनी देवीच्या वतीने देण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून दर्शनासाठी प्रतीक्षा संपली आहे.


दरम्यान दि.06, दि. 08 सप्टेंबर रोजी  नियोजनाप्रमाणे श्री भगवती मंदिरात सहस्त्रकलस महापूजन विधि तसेच इतर धार्मिक पूजा विधींचे आयोजन करण्यात येणार असून आणि संपूर्ण पितृपक्षात भक्तांच्या कल्याणासाठी विधिवत पूजा नवरात्रीपूर्वी संपन्न होणार आहे. त्यानंतर सर्व भाविकांना श्री भगवती सोमवार दि. 26 सप्टेंबर पासून दर्शनासाठी खुले होणार आहे. 


सप्तश्रृंगीचे स्वयंभू रूप
श्री भगवती स्वरूप मूर्ती संवर्धन प्रक्रिया सुरू केल्यानंतर श्री भगवतीच्या स्वरूपावरील मागील कित्येक वर्षांपासून साचलेला शेंदुरलेपणाचा भाग हा धार्मिक व शास्त्रोक्त पद्धतीने काढण्यात आला. त्यामागे श्री सप्तशृंगी भगवतीची अति प्राचीन व स्वयंभू स्वरूपातील मूर्ती समोर आली. त्यामुळे वर्षानुवर्ष श्री भगवतीच्या स्वरूपावर धार्मिक विधी व पंचामृत दरम्यान केलेल्या शेंदूर लेपणाच्या मागे आढळून आलेल्या श्री भगवतीच्या अति प्राचीन विलोभनीय व स्वयंभू स्वरूप लवकरच सर्वसामान्य भाविकांच्या दर्शनासाठी उपलब्ध होणार आहे.