नाशिक : पहिल्या पावसानंतर जवळपास पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर नाशिक शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने आज हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. तर जिल्ह्यातील बळीराजा अद्यापही जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.
आज शहरात सकाळपासून उकाडा जाणवत होता. त्यातच दुपारी वातावरणात बदल होऊन पावसाळा सुरुवात झाली. गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण असलेल्या नाशिककरांवर आज पावसाचा शिडकावा झाल्याने आल्हाददायक वातावरण तयार झाले आहे. तर पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या वतीने सगळ्या यंत्रणांना अलर्ट देण्यात आला आहे.
राज्यात मान्सून सक्रिय झाला आहे. हळूहळू मान्सून राज्यात पुढे सरकत आहे. काही ठिकाणी चांगला पाऊस पडत आहे. तर काही ठिकाणी अद्यापही पावसाची प्रतीक्षा आहे. राज्याच्या विविध भागात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. अशात नाशिक शहर आणि जिल्ह्यातही पावसाच्या सरी बरसल्या आहेत. तब्बल 15 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाने हजेरी लावली. मात्र अदयापही जिल्ह्याला जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
आज दुपारी दीड ते सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत हवामान खात्याने नाशिकसह परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचे संकेत दिले होते. यासोबतच, ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट होईल असेही सांगण्यात आले होते. त्यानुसार दुपारच्या सुमारास शहरासह जिल्ह्यातील काही भागात पावसाच्या सरी कोसळल्या.
अनेक भागात लाईट गायब
नाशिक शहरात पावसाने आगमन केल्यानंतर नेहमीप्रमाणे अनेक भागातील बत्ती गुल झाल्याचे पाहायला मिळाले. तर गेल्या दीड दोन वर्षांपासून सुरू असलेल्या स्मार्ट कामांचा या पावसामुळे बोजवारा उडाला आहे. यासोबतच अर्धवट स्मार्ट कामाच्या ठिकाणी पाणी साचले आहे.
बळीराजा प्रतीक्षेतच...
नाशिक सह जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली असली तरी अद्यापही अनेक भागात पावसाच्या प्रतीक्षेत बळीराजा आस लावून आहे. अद्याप जिल्ह्यात एक टक्काही पेरणी झाली नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.