नाशिक : नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढें यांनी आपल्या कामाचा धडका सुरुच ठेवला आहे. कारण महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच अग्निशमन विभागाच्या प्रमुखांना १ लाख रुपयाचा दंड ठोठावण्यात आला आहे.

संबंधित अधिकाऱ्यावर कामात हलगर्जीपणाचा केल्याचा ठेपका ठेवण्यात आला आहे. त्याच दिवशी नवीन नाशिक विभागातील वरिष्ठ लिपिक, पश्चिम विभागातील वायरमन आणि पंचवटी विभागातील शिपाई अशा तिघांना निलंबित करण्यात आलं आहे.

आयुक्तांच्या या धडकेबाज कामगिरीविरोधात महापालिकेतील कर्मचारी संघटनांनी आंदोलनाचे हत्यार उपसण्याचा प्रयत्नही केला. पण चुकीची कारवाई केली असेल तर सिद्ध करुन दाखवा असा सज्जड दम आयुक्तांनी भरल्यान कामगार संघटनाही दोन पावलं मागे सरकल्या आहेत.

विशेष म्हणजे गेल्या दोन महिन्यात आजवर १७ ते १८ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे तर सात ते आठ अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.