नाशिक: कडक शिस्तीचे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी, नाशिक मनपाचे आयुक्तपद स्वीकारल्यानंतर, तिकडेही अधिकाऱ्यांची पळता भुई थोडी केली आहे.


तुकाराम मुंढे यांनी नाशिकमध्येही कामाचा सपाटा लावला आहे.

आज त्यांनी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलकुंभ जलशुद्धीकरण प्रकल्पांची पाहणी केली. शहराला 24 तास पाणी पुरवठा करण्याचे सुतोवाच मुंढे यांनी केले आहेत.

त्या पार्श्वभूमीवर आजच्या दौऱ्याला महत्व प्राप्त होतंय. बाराबंगला जलशुद्धीकरण प्रकल्पातील कामकाजाची पाहणी करण्यासाठी तुकाराम मुंढे स्वत: शिडीवर चढून, थेट पत्र्यावर जाऊन पोहचले.

त्यांच्या मागे मागे अधिकाऱ्यांची मात्र दमछाक होत होती. ते शिडीवरून खाली उतरताना जीव मुठीत धरुन उतरत होते.

जलशुद्धीकरण केंद्रातील घाण- कचरा दोन दिवसात स्वच्छ झाला नाही, तर निलंबित करु, अशा इशारा तुकाराम मुंढे यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.

स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत जलशुद्धीकरण केंद्र स्वयंचलित केले जाणार आहे. निलगिरी बाग परिसरातील जलशुद्धीकरण केंद्राचे अत्याधुनिकीकरण एक महिना रखडल्याने, संबधित अधिकाऱ्यांवर कारवाई करुन, ठेकेदाराला दहा टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.