नाशिक: सावरखेड एक गाव हा सिनेमा तुम्ही पाहिला असेल. हे गाव ज्याप्रकारे दहशतीत असतं, त्याचप्रकारे नाशिक जिल्ह्यातील एक गाव सध्या दहशतीत आहे.
नाशिक जिल्ह्यातल्या लहवित या गावात मागच्या 15 दिवसांपासून अधून-मधून दगडफेक होत आहे. धक्कादायक म्हणजे ही दगडफेक कोण करतं, का करतं...याचं उत्तर अजून मिळालेलं नाही.
एखाद्या घरावर किंवा ज्याठिकाणी गावकरी बसलेले आहेत, अशा ठिकाणी एका बाजूनं अचानक दगडं येतात.
दगडं कुठून आली, याचा शोध घ्यायला तिथपर्यंत पोहोचण्याची धडपड केली, तर तेवढ्यात दगडफेक बंदही होते. आतापर्यंत अनेकांच्या घरांचं यात नुकसान झालं आहे तर अनेक जण जखमीही झाले आहेत.
काहींनी तर हा देवाचा कोप असल्याचाही समज करुन घेतला आहे. मात्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं हा प्रकार खोडसाळपणातून होत असल्याचा दावा केला आहे.
गावात भीतीत
लहवित हे गाव नाशिक शहरापासून 25 किलोमीटर आहे. या दगडफेकीमुळे या गावात सर्वत्र नीरव शांतता, रस्ते सुनसान आणि व्यवहार ठप्प झाले आहेत. एकटे-दुकटे रस्त्याने फिरणारे क्वचित दिसतात.
गावात कुणीही अनोळखी आले तरी भेदरलेल्या नजरा संशयानेच रोखल्या जातात. एकटं दुकटं राहण्याऐवजी सगळे गटागटानेच एकत्र येतात. चर्चा होते ती फक्त दगडफेकीची.
या गावात धुलीवंदनापासून म्हणजेच गेल्या 15 दिवसांपासून तुफान दगडफेक होतेय. कधी सकाळी, कधी संध्याकाळी तर कधी रात्रीच्या अंधारात दगड येतात.
या दगडफेकीत एक दोन नागरिक जखमी झाले आहेत. घरांचे नुकसान झालं, पत्रे फुटले आणि मनात भरलेली भीती तर विचारुच नका.
हे सर्व घडत असताना दगडफेक कोण करतो हे कोणालाच कळत नाही. काहींना हा खोडसाळपणा वाटतोय तर काहींना देवाचा कोप. देवाचा कोप दूर करण्यासाठी गावात नुकतीच मोठी पूजा करण्यात आली, भंडारा बनविण्यात आला. अंधश्रध्देचं मोठं पीक आलं. मात्र दगडफेक काही थांबली नाही.
पोलिसांनीही या घटनेत लक्ष घातलं असून, गावातीलच काही टारगट दगडफेक करत असल्याचा संशय त्यांना आहे.
गावात पोलिसांची अधूनमधून गस्त होते, पण अद्याप पोलिसांच्या हाती काहीच सुगावा लागला नाही.
तर हा निव्वळ खोडसाळपणा असून अंधश्रद्धा पसरविण्याचा प्रकार असल्याचा दावा अंनिसने केला आहे.
गावात होणाऱ्या दगडफेकीमागे कोणाचा हात आहे, त्यांचा उद्देश काय आहे हे काही दिवसात स्पष्ट होईल. मात्र त्याआधी कोणाला गंभीर इजा झाली तर त्याला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित होत असून, पोलिसांनी सोक्षमोक्ष लावावा अशी मागणी होत आहे.