नाशिक : नाशिकमध्ये अल्पवयीन मुलीवर 15 वर्षीय मुलाने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप झाला होता. मात्र मेडिकल रिपोर्टनुसार बलात्कार झाला नसून, अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाल्याचं स्पष्टीकरण नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिलं आहे.


तळेगावची घटना अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक आहे. या प्रकरणात कुठलीही दिरंगाई होणार नाही, पारदर्शी तपास होईल, फास्ट ट्रॅकवर तपास करु, असं आश्वासनही महाजन यांनी दिलं. मुलीवर बलात्कार झालेला नाही, डॉक्टरांनी सांगितल्यानुसार अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाला आहे. सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहनही त्यांनी केलं.

त्र्यंबकेश्वर तालुक्यात तळेगावमध्ये शनिवारी दुपारी ही घटना घडल्याचा आरोप आहे. वृत्त पसरल्यानंतर संतप्त जमावानं संशयित आरोपी असलेल्या अल्पवयीन मुलाच्या घराची तोडफोड केली. तसंच काही वाहनांची जाळपोळही केली. या घटनेचे पडसाद नाशिक शहरातही उमटले. पोलिस आयुक्तांनी नागरिकांना शांतता बाळगण्याचं आवाहन केलं आहे.

मुख्यमंत्र्यांकडून शांततेचं आवाहन :


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. पालकमंत्री गिरीश महाजनांनी पीडित मुलीची भेट घेतली आहे. दोषींना शिक्षा देण्यासाठी फास्ट ट्रॅकवर कारवाई करू, असं आश्वासन त्यांनी दिलं. अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये, प्रशासन परिस्थिती शांत करण्यासाठी प्रयत्न करत आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

UPDATE : मालेगावहून मनमाड, नाशिक, शिर्डीकडे जाणाऱ्या एसटी बस रद्द, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एसटी प्रशासनाचा निर्णय, तासाभरापासून प्रवासांचा बस स्थानकांवर खोळंबा

UPDATE : मुंबई-आग्रा हायवेवर एसटी बसची तोडफोड, ओझरजवळ बस फोडली

UPDATE : मुंबई-आग्रा हायवेवर रास्तारोको, घोटीजवळ वाहतूक ठप्प

UPDATE : घोटी, इगतपुरी बाजारपेठ बंद, नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्ताही बंद

UPDATE : जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांचा हवेत गोळीबार

UPDATE : पोलिसांच्या तीन गाड्या जाळल्याची माहिती

दोषी मुलावर गुन्हा दाखल करावा आणि त्याला कठोर शिक्षा द्यावी या मागणीसाठी नाशिकमध्ये रास्तारोको करण्यात आला. यामुळे काही वेळासाठी मुंबई-नाशिक महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती. या सर्व प्रकारामुळे रात्री नाशिकमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली होती, मात्र पोलिसांनी वेळीच परिस्थितीवर नियंत्रण मिळवत संतप्त जमावाला शांत केलं.