नाशिक : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी चांदवडला मुस्लिम समाज रस्त्यावर उतरला आहे. राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी बेमुदत उपोषण सुरू केले. राज्यभरही मराठा समाजबांधवांचे उपोषण सुरू आहे. या मागणीला पाठिंबा दर्शविण्यासाठी चांदवडच्या मुस्लिम बांधवांनी रॅली काढून शासकीय विश्रामगृहासमोर उपोषणाला बसलेल्या मराठा बांधवांना पाठिंबा असलेले निवेदन दिले.


नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील सकल मराठा समाज बांधव हे साखळी उपोषण करत आहे. समाजाला शासनाने आरक्षण द्यावे ही मागणी रास्त असून शासनाने आरक्षणाबाबत तातडीने कार्यवाही करावी, मराठा समाजाला न्याय द्यावा यासाठी चांदवड शहर व तालुका मुस्लिम समाजाने पाठिंबा दिलेला आहे. तरी शासनाने मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मराठा समाजाबरोबर मुस्लिम समाजही मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी खांद्याला खांदा लावून आंदोलनात सहभागी होईल, असेही मुस्लिम बांधवांनी सांगितले. त्याचबरोबर नांदगाव तालुक्यातही याचे पडसाद उमटू लागले आहे. सर्वपक्षीय आमदार, खासदार, मंत्री आणि पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना वंजारवाडी आणि धोटाणे खुर्द गावात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. 



नांदगाव तालुक्यात पुढाऱ्यांना गावबंदी


मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देत नांदगाव तालुक्यातील वंजारवाडी आणि धोटाणे खुर्द येथील ग्रामस्थांनी राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी केली आहे. गावबंदीचे फलक गावात लावण्यात आले असून, जोरदार घोषणाबाजी करत आरक्षण मिळाले पाहिजे, अशी मागणी मराठा बांधवांनी केली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे. सरकारला दिलेली मुदत संपली असून सरकारने कुठलीही हालचाल केलेली नाही. त्यामुळे आता गावागावात याचे पडसाद उमटायला सुरवात झाली आहे. गावागावातील मराठा समाज आरक्षणासाठी पुन्हा एकदा आक्रमक होत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक गावांनी आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, राजकीय नेत्यांना गावबंदी केली आहे. 


इतर महत्वाची बातमी : 


Manoj Jarange : कुणाला काही झाल्यास सरकार जबाबदार, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा