नाशकात योगा शिक्षिकेवर मंदिरात हल्ला, महिला गंभीर जखमी
प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक | 08 Dec 2016 08:21 PM (IST)
नाशिक : मुंबईत सोनसाखळी चोराच्या हल्ल्यात एका महिलेनं जीव गमावल्याची घटना ताजी असतानाच नाशिकमध्ये मंदिरात एका महिलेवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. डोक्यावर लोखंडी रॉडने वार केल्यामुळे शिक्षिका गंभीर जखमी झाली आहे. बुधवारी सकाळी नाशिकच्या शरणपूर रोडवरील योगाचा क्लास संपवून योगा शिक्षिका ज्योती जैन जवळच्याच दत्त मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. दर्शन घेत असतानाच एका अज्ञात व्यक्तीनं मागून येऊन त्यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडनं वार केला. यात त्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर आयसीसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. वार केल्यानंतर हल्लेखोर फरार झाला आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून हल्लेखोराचा शोध सुरु आहे.