नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पिंपळगावातल्या सराफाच्या दुकानात झालेल्या चोरीचा अवघ्या 24 तासात उलगडा झाला आहे. दुकानातील नोकरानेच साडे दहा किलो सोन्याची चोरी केल्याचं पोलिस तपासात उघड झालं आहे.

पिंपळगावात श्रीनिवास ज्वेलर्समध्ये गुरुवारी पहाटे ही धाडसी चोरी झाली. चोरट्यांनी बनावट चाव्यांच्या सहाय्याने ज्वेलर्स शोरुममध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी तिजोरीतील सोनं चोरुन नेलं. सकाळी साडेआठच्या सुमारास ज्वेलर्सचे मालक अशोक चोपडा आले असता, त्यांना तिजोरीतील सोनं गायब झाल्याचं लक्षात आलं.

ना शटर उचकटलं, ना तिजोरी फोडली, तरीही 10 किलो सोनं पळवलं!


आरोपी नोकराने तब्बल 4 कोटी रुपये किंमतीचं सोनं विहिरीत लपवलं होतं. नाशिक ग्रामीण पोलिसांनी चोराला ताब्यात घेऊन साडे दहा किलो सोन्यापैकी सुमारे सव्वा सात किलो सोन जप्त केलं आहे. उरलेलं सव्वा तीन किलो सोनंही लवकर हस्तगत केलं जाईल.

पोलिसांनी 14 कर्मचारी आणि दुकानाच्या मालकाशी संबंधिक व्यक्तींची रात्रभर चौकशी करण्यात आली. या चौकशीत नोकरानेच बनावट चाव्या बनवून चोरी केल्याचं उघड झालं. चोरी केलेलं सोनं पिशवीत बांधून चांदवड तालुक्यातील एका खेडगावात असलेल्या विहिरीत लपवलं होतं.