नाशिक: नाशिक जिल्ह्यातील पिंपळगावातल्या सराफाच्या दुकानातून तब्बल 10 किलो सोन्याची चोरी झाली आहे.

विशेष म्हणजे शटर, तिजोरीची कुठलीही तोडफोड न करता बनावट चावीच्या माध्यमातून ज्वेलर्समध्ये प्रवेश करुन ही चोरी करण्यात आल्याचं समोर आलं आहे.

पिंपळगावात श्रीनिवास ज्वेलर्समध्ये गुरुवारी मध्यरात्री ही धाडसी चोरी झाली. चोरट्यांनी बनावट चाव्यांच्या सहाय्याने ज्वेलर्स शोरुममध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी तिजोरीतील सोनं चोरुन नेलं. सकाळी साडेआठच्या सुमारास ज्वेलर्सचे मालक अशोक चोपडा आले असता, त्यांना तिजोरीतील सोनं गायब झाल्याचं लक्षात आलं.

शटर तोडलेले नाही, तिजोरी फोडलेली नाही, मग सोनं गेलं कुठे असा प्रश्न चोपडांना पडला. अखेर त्यांनी पोलीस ठाण गाठलं. तिजोरीत 15 किलो सोनं होतं असा दावा चोपडा यांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यापैकी बहुतांश सोनं चोरांनी नेल्याचा अंदाज आहे.

पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन तपास सुरु केला. चोपडा आणि त्यांच्या चाव्यांशी संबंध येणाऱ्यांपैकी कुणीतरी बनावट चावी बनवून ही चोरी केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.