नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी 'इस्रो'नं आपल्या ज्ञानाची कवाडं खुली केली आहेत. इस्रोच्या मार्गदर्शनाखाली प्रगतीपथावर जाणारं नाशिक हे देशातील पहिलं शहर ठरणार आहे.


इस्रोच्या शास्त्रज्ञांनी नाशिकमध्ये कार्यशाळा घेत उपग्रहामार्फेत सर्वेक्षण करण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. एखाद्या लोकसभा मतदारसंघाची इस्रोनं अशी जबाबदारी घेण्याची ही देशाच्या इतिहासातील पहिलीच वेळ आहे. खासदार हेमंत गोडसे यांच्या मागणीनुसार नाशिकच्या विकासासाठी मार्गदर्शन करण्याचं काम इस्रोने सुरु केलं आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी इस्रो जीआयएस अॅप्लीकेशन तयार करणार आहे. इस्रोच्या साईटवर नाशिकची मायक्रोसाईटही तयार करण्याचं काम सुरु करण्यात आलं आहे.

इस्रोकडे स्पेस टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून मिळालेली सर्व माहिती नाशिक लोकसभा मतदारसंघाला देण्यात आली. शेती, पाणी, उद्योग, टेलीकम्युनिकेशन अशा क्षेत्रात भविष्यातील विकासाचा अजेंडा इस्रोच्या अधिकाऱ्यांनी मांडला.

इस्रोचे सचिव असलेले जेष्ठ वैज्ञानिक डॉ. पी. जी. दिवाकर यांच्यासह ज्येष्ठ वैज्ञानिकांनी सोमवारी नाशिक
जिल्हाधिकारी कार्यालयात आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी महसूल, कृषी, जलसंपदा, भूमीअभिलेख, बीएसएनएल, पाटबंधारे, एमआयडीसी, वीज मंडळांसह विविध विभागांचे अधिकारी, महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

भविष्यात नाशिकच्या विकासाला गती देण्यासाठी इस्रोच्या ज्ञानाची चाकं नाशिकला मिळणार असली, तरी
नाशिककरांनाही या मोहिमेसाठी स्वत:ला इस्रोशी जोडून घ्यावं लागेल, असं आवाहन इस्रोकडून यावेळी करण्यात आलं.