नाशिक : सध्या नाशिकच्या महिलांना दागिने घालून घराबाहेर पडणं मुश्कील झालं आहे. त्यामागचं कारण म्हणजे सोनसाखळी चोरांनी नाशकात घातलेला धुमाकूळ. गेल्या 2 महिन्यांत नाशकात तब्बल 45 सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या आहेत.


रिक्षातून प्रवास करणाऱ्या महिलांना चोरट्यांनी लक्ष्य केलं आहे. विशेष म्हणजे पोलिसांचे नातेवाईकही सोनसाखळी चोरांचे सावज ठरले आहेत. 65 वर्षीय निवृत्त शिक्षिका उषा सरदार यांचे भाऊ पोलीस दलात आहेत. दोन दिवसांपूर्वी मुंबईहून नाशिकला परतताना सोनसाखळी चोरांनी त्यांच्या गळ्यातलं मंगळसूत्र हिसकावलं.

उषा यांनी सोनसाखळी चोरांचा पाठलाग करण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र चोरट्यांनी धूम स्टाईलनं पळ काढला. सोनसाखळी चोरीच्या घटनांप्रमाणेच नाशकात घरफोडी, वाहनचोरी, मारहाण अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. मात्र गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यात पोलीस सपशेल अपयशी ठरत आहेत.

काहीच दिवसांपूर्वी नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'मी नाशिक दत्तक घेत आहे' अशी घोषणा केली. मात्र तेव्हापासूनच नाशिकमध्ये गुन्हेगारीने चांगलंच डोकं वर काढलं असून नाशिकचेही जणू आता नागपूर होऊ लागल्याचं म्हटलं जात आहे.