नाशिक : नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदानावर सुरुअसलेल्या आंतरतालुका क्रिकेट स्पर्धेत सध्या एकच नाव गाजतंय, ते म्हणजे दयानंद जाधव याचं. खरं तर दयानंदला डाव्या कोपरापासून एक हात नाही. पण दोन्ही हातापायांनी सुदृढ असलेल्या खेळाडूंच्या साथीनं लेदरबॉल क्रिकेटचं मैदान गाजवण्यात तो कुठेही कमी पडताना दिसत नाही.


लगान चित्रपटातलं कचरा नावाचं पात्र भारताचे महान स्पिनर भागवत चंद्रशेखर यांच्यावर बेतलं होतं. चंद्रशेखर यांनी लहानपणीच पोलियोग्रस्त झालेला आपला उजवा हात भविष्यात आपल्या कारकीर्दीचं बलस्थान बनवलं. लगान चित्रपटातला कचरा आणि भागवत चंद्रशेखर यांची आठवण होण्याचं कारण नाशिकचा दयानंद जाधव हा दिव्यांग क्रिकेटर.

दयानंदला डाव्या कोपरापासून हात नाही. पण एका हातानंच फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणही करुन तो नाशिकची आंतरतालुका क्रिकेट स्पर्धा गाजवत आहे.

दयानंद जाधव त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या अंजनेरी या लहानशा गावचा क्रिकेटर आहे. आईवडील शेतमजुरी करतात. त्यामुळे पोटापाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी दयानंद फोटोग्राफीचा व्यवसायही करतो. लहानपणापासून त्याला एक हात नाही. पण दिव्यांग दयानंदनं नशिबाला बोल न लावता मेहनतीवर भर दिला. त्याच्या जिद्दीला अंजना स्पोर्टस क्लबचीही साथ लाभली.

दोन्ही हातापायांनी सुदृढ असलेल्या खेळाडूंचं कसब दयानंद जाधवनंही आपल्या अंगी बाणलं आहे. तो एका हातानं चेंडू जितक्या लीलया वळवतो आणि तितक्याच सहजतेनं टोलवतोही.

दिव्यांग खेळाडूंच्या भारतीय संघात स्थान मिळवण्याचं दयानंदचं स्वप्न आहे. त्यादृष्टीनं मेहनत करण्याची तयारीही आहे. पण त्याच्या मेहनतीला आपल्या मार्गदर्शनाचीही गरज आहे.