नाशिक : उन्हाच्या काहिलीपासून स्वतःचं संरक्षण करताना नाशिककर गणपती बाप्पालाही विसरले नाहीत. नाशिकच्या रविवार कारंजामध्ये सिद्धिविनायकाला उन्हापासून वाचवण्यासाठी चक्क चंदनाचा लेप लावण्यात आला आहे.


इतकंच नाही तर मोगरा, गुलाब, चाफ्याच्या फुलांची सुगंधी सजावटही करण्यात आल्याने चांदीच्या गणपतीचं रुप अधिकच लोभसवाणं झालं आहे. फुलांच्या तजेल्यामुळे सध्या मंदिरातल वातावरण आणखी प्रसन्न झालं आहे.

उन्हाच्या झळांमुळे सध्या सर्वच जण हैराण आहोत. गणपती बाप्पालाही त्रास होऊ नये म्हणून भक्तांनी चंदनाचा लेप लावण्याचा निर्णय घेतला. नाशिकमध्ये या वर्षी गेल्या सात वर्षातलं सर्वाधिक तापमान नोंदवण्यात आलं आहे.

रविवार आणि सोमवार अशी दोन दिवस ही सजावट ठेवण्यात आली. मंगळवारी विधिवत चंदन उतरवले जाणार आहे. त्यामुळे 'चंदनाची उटी कुमकुम केशरा' या शब्दाचा अनुभव खऱ्या अर्थाने इथे आला.