Nashik Firecrackers Banned : उत्तर महाराष्ट्राला फटाके वाजवून दिवाळी साजरी करता येणार आहे. कारण नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या मध्यस्थीनंतर फटाकेबंदीचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रात फटाकेबंदी लागू करण्यासंदर्भात विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी काल निर्देश दिले होते. मात्र हे निर्णय मागे घेण्यात यावेत म्हणून भुजबळांनी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटेंशी संवाद साधला. 


विभागीय आयुक्तांच्या निर्णायामुळं यंदाची दिवाळी फटाक्याविना जाणार का? असा प्रश्न नाशिककरांसमोर उपस्थित झाला होता. तसेच, लोकप्रतिनिधींसह फटाका विक्रेत्यांनीही या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केली होती. या नाराजीचं प्रमुख कारण म्हणजे, ज्या विक्रेत्यांनी गेल्या वर्षभरापूर्वीच फटाके खरेदी केले होते, त्या फटाक्यांचं काय करायचं? हा प्रश्न उपस्थित झाला होता. अशातच साधारणतः दीड वर्षानंतर नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. त्यामुळे येणारी दिवाळी उत्साहात साजरी करावी अशी, सर्वसामान्यांची अपेक्षा होती. मात्र हवेची गुणवत्ता चांगली राहावी आणि माजी वसुंधरा कार्यक्रमातंर्गत अधिकाधिक निधी मिळावा, हे कारण पुढे करुन विभागीय आयुक्तांनी सुचना काढलेल्या होत्या. 


विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नाशिक, धुळे, नगर, जळगांव, नंदुरबार जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना पत्र लिहून यंदा फटाक्यावर निर्बंध घालण्यात यावेत, अशा सूचना केल्या होत्या.  दिवाळीत फटाक्यांची मोठी आतषबाजी केली जाते. यामुळे प्रदूर्षण मोठ्या प्रमाणावर होते. दिवाळीत होणारे हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी फटाक्यावर बंदी आणण्याचे आदेश, आयुक्त गमे यांनी दिले होते.


दिवाळीची तयारी सुरु असतानाच विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात फटाक्यावर बंदी आणण्याचा प्रस्ताव महासभेत सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या. आयुक्त गमे यांच्या या प्रस्तावामुळे यंदाची दिवाळी फटाक्याविना जाणार का? असा सवाल उपस्थित झाला होता. प्रदूर्षण रोखण्यासाठी उत्तर महाराष्ट्र विभागातील सर्व महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने फटाके विक्री आणि वापर यावर बंदी घालण्याचा ठराव मंजूर करावा, अशी सूचना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पत्राद्वारे केली होती. त्यामुळे यावर्षीची दिवाळी फटाक्याविना साजरी करावी लागण्याची चिन्हे दिसू लागली होती. विभागीय आयुक्तांच्या या पत्रानुसार नाशिक, धुळे, जळगाव,  नंदुरबार व नगर जिल्ह्यात ठराव झाल्यास दिवाळी फटाक्यांशिवाय साजरी करावी लागणार होती. परंतु, पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या मध्यस्थीनंतर आता उत्तर महाराष्ट्राला फटाके वाजवून दिवाळी साजरी करता येणार आहे.