नाशिक पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेला डमी विद्यार्थी, दोघे अटकेत
प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक | 11 Apr 2018 10:49 AM (IST)
आडगाव ग्रामीण पोलिस मुख्यालयात सोमवारी पोलिस शिपाई भरतीची लेखी परीक्षा सुरु होती.
नाशिक : नाशिक पोलिस शिपाई भरतीच्या लेखी परीक्षेला डमी विद्यार्थी बसल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करुन एका तरुणाला अटक केली आहे. आडगाव ग्रामीण पोलिस मुख्यालयात सोमवारी पोलिस शिपाई भरतीची लेखी परीक्षा सुरु होती. या परीक्षेत मूळचा औरंगाबादचा असलेला वीरसिंह कवाळे ह्या तरुणाच्या जागेवर देवसिंह जारवाल हा 21 वर्षीय विद्यार्थी परीक्षा देत होता. देवसिंह जारवाल हा मूळचा जालन्याचा आहे. पँटच्या समोरील बाजूस छिद्र पाडून देवसिंहने आत सॅमसंग कंपनीचा मोबाईल ठेवत प्रश्नपत्रिकेचे फोटो काढले. ही बाब पर्यवेक्षकांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने ह्याची माहिती पोलिसांनी दिली. या दोघांवर आडगाव पोलिस स्टेशनमध्ये सरकारची फसवणूक तसंच महाराष्ट्र विद्यापीठ बोर्ड आणि गैरव्यवहार अधिनियमन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आधी देवसिंह जारवाल या तरुणाला अटक केली. तर पसार झालेला वीरसिंह कवाळे पोलिसांसमोर हजर झाला, त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.