Bonded Labour : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील इगतपुरी (igatpuri) तालुक्यातील उभाडी येथील अल्पवयीन मुलांकडून जिल्ह्याबाहेर वेठबिगारीची कामं करून घेणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाने कायदेशीर कारवाई केली आहे. शिवाय नागरिकांनी वेठबिगारीसारख्या (Bonded Labour) कुप्रथेस प्रोत्साहन देऊ नये. तसेच आपल्या आजूबाजूच्या परिसरात अशी संशयित अल्पवयीन मुले आढळून आल्यास त्याबाबतची माहिती महसूल, पोलीस, आदिवासी व कामगार विभागांना द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी (Nashik Collector) गंगाथरन डी. यांनी केले आहे.
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील मौजे उभाडे गावातील काही बालके जिल्ह्याबाहेरील ठिकाणी मेंढीपालनाचे काम करीत असल्याचे मागील काही दिवसात प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. ही बाब अतिशय गंभीर असून संबंधित लोकांविरोधात वेठबिगारी प्रतिबंध कायदा 1976, बालकामगार अधिनियम 1986 सुधारित 2017, अ.जा.ज.का.क. 3( i )( h ), भा.द.वि. कलम 374 प्रमाणे पोलीस विभागामार्फत कायदेशीर कार्यवाही करण्यात आलेली आहे.
नाशिक जिल्ह्यातील अजून काही बालके बेपत्ता असल्याची व मुलांकडून मेंढीपालन, शेतीकामे व इतर वेठबिगार स्वरूपाची कामे काही लोकांकडून आणि आस्थापना मालकांकडून करून घेण्यात येत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनास प्राप्त झालेली आहे. ज्यांच्याकडे अशी बालके काम करत असतील त्यांनी या मुलांना तत्काळ संबधित मुलांच्या पालकांकडे सुखरूप स्वाधीन करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. याबरोबरच जिल्हा प्रशासनाच्या विविध विभागाकडून संयुक्त तपासणी आयोजन करून अशा बेपत्ता झालेल्या बालकांची चौकशी करण्यात येणार आहे. तसेच अशा वेठबिगारीची माहिती नागरिकांनी दिल्यास माहिती देणाऱ्यांची नावे गोपनीय ठेवण्यात येतील. असे देखील जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी सांगितले आहे.
नेमक प्रकरण काय?
काही दिवसांपूर्वी इगतपुरी येथील कातकरी समाजातील मुलांच्या वेठ बिगारीबाबतचा प्रश्न पुढे आला होता. प्रत्येकी पाच हजार रुपये आणि एका मेंढीच्या बदल्यात इगतपुरी तालुक्यातील कातकरी पाड्यांवरच्या मुलांची खरेदी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील गौरी आगिवले या बालिकेचा संशयास्पद मृत्यू झाला होता. या मृत्यूचा तपास सुरु असताना मुलांच्या विक्री संदर्भातील हे रॅकेट उघड झाले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील घारगाव, संगमनेर तालुका आणि पारनेर पोलीस ठाण्यात वेगवेगळे तीन गुन्हे दाखल आहेत.
महत्वाच्या बातम्या
Exclusive : धक्कादायक...! पालघरच्या मोखाड्यात मुलाच्या कफनासाठी वेठबिगारी, जाचाला कंटाळून मजुरानं जीवन संपवलं