नाशिक: चलन तुटवडा आणि गैरव्यवहार यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या नाशिक जिल्हा बँकेच्या संचालक मंडळानं आता राजीनामा अस्त्र उगारलं आहे.


नोटाबंदीच्या काळात बँकेनं स्वीकारलेल्या 342 कोटी रुपयांच्या नोटा सरकारनं स्वीकारल्या नाहीत. तर राजीनामे देऊ असा इशारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षांनी दिला आहे. तर दुसरीकडे 10 लाख खातेधार, शेतकरी, नोकरदार वर्ग बँकेमुळे पूर्णपणे अडचणीत आला आहे.

खरं म्हणजे नाशिक जिल्हा बँक ही सुस्थितीतली बँक समजली जात होती. मात्र, मागच्या सहा महिन्यात गैरव्यवहाराचे आरोप, नोटाबंदीचा परिणाम यामुळे बँक डबघाईला आली आहे. त्यात जिल्हा बँकेच्या अध्यक्षांनी राजीनाम्याचा इशारा दिल्यानं जिल्हा बँकेच्या अस्तित्वाबाबत आता पुन्हा प्रश्नचिन्हं उभं राहिलं आहे.

नोटाबंदीच्या काळातील नाशिक जिल्हा बँकेचा नेमका तिढा काय आहे?  

हजार-पाचशेची नोट बंद झाली त्या रात्रीतून संचालकांनी खेळत्या भांडवलातल्या तब्बल ५० कोटींच्या नोटा अदलाबदली केल्याचा आरोप

त्यानंतरच्या २४ तासांत जिल्हा बँकेच्या २१३ शाखांमध्ये तब्बल ३४२ कोटी रुपयांच्या नोटा जमा झाल्या. डमी खात्यांच्या माध्यमातून कमिशनखोरी करत संचालकांनीच शेतकऱ्यांच्या नावाखाली पैसे भरले असे आरोप झाले.

संशयास्पद व्यवहार असल्याचं सांगत केंद्र सरकारने या नोटा स्वीकारण्यास नकार दिला.

जानेवारी महिन्यात व्यवहार सुरळीत सुरु झाल्यानंतर ज्यांनी हे ३४२ कोटी खात्यांवर भरले होते. त्यांनी हे पैसे काढून घेतले. त्यामुळं बँकेचे ३४२ कोटीचं नवं चलन गेलं आणि जुनं ३४२ कोटीचं चलन तिजोऱ्यांमध्ये पडून आहे.