नाशिक : नाशिक जिल्ह्यातल्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप तुर्तास मागे घेण्यात आला आहे. राज्याचे आरोग्य मंत्री दीपक सावंत यांनी डॉक्टरांच्या मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिल्यानंतर, हा संप मागे घेण्याचा निर्णय डॉक्टरांच्या संघटनांनी घेतला.


मनमाडमध्ये काल रुग्णाला उपचारासाठी दाखल करुन घेण्यास डॉक्टरांनी नकार दिल्याने, संतप्त नातेवाईकांनी डॉक्टर व नर्सला मारहाण केल्याची घटना घडली. त्याचे पडसाद आज नाशिक जिल्ह्यात उमटले. जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी आणि संघटनांनी संप पुकारला होता.

यामध्ये जिल्हा शासकीय रुग्णालय, 3 उपजिल्हा रुग्णालय, 29 ग्रामीण रुग्णालय,104 प्राथमिक आरोग्य केंद्रातील बाह्यरुग्ण विभाग आज बंद ठेवण्यात आले होतं.

तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयातील प्रवेशद्वारावर मॅग्मो संघटनेकडून आरोपींना कडक शासन व्हावे, यासाठी आंदोलन करण्यात आलं. डॉक्टरांनी अचानक पुकारलेल्या या संपाने रुग्णांचे लाह होत होते.

पण आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्या सोबत झालेल्या बैठकीनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. या बैठकीवेळी आरोग्यमंत्र्यांनी डॉक्टरांना मनमाडमधील घटनेतील आरोपींना कडक शासन करण्यात येईल, असं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं.