Nashik News : नाशिकमध्ये (Nashik) सध्या साथींच्या आजारांनी नागरिकांची डोकेदुखी वाढली असून सर्दी, खोकला या सामान्य आजारांसह नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नाशिक शहरात डेंग्यूच्या (Dengue) रुग्णांमध्ये वाढ झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान नाशिक शहरात सध्या सर्दी, खोकला, डोकेदुखी या सामान्य आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. तर दुसरीकडे डेंग्यूचे रुग्ण वाढल्यामुळे धोकादायक आरोग्य विभागाने चिंता व्यक्त केली आहे. नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात जवळपास डेंग्यूचे 58 रुग्ण आढळून आले आहेत. वातावरणात सातत्याने बदल होत असल्याने शिवाय थंडीचा कहर सुरू झाल्याने व्हायरल इन्फेक्शनचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे शहरातील दवाखाने नागरिकांनी भरू लागले आहेत. त्यातच डेंग्यू आजाराने डोके वर काढल्याने नागरिकांनी योग्य त्या उपाययोजना राबविण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान यावर्षी ऑक्टोबरमध्ये सर्वाधिक 157 डेंग्यू रुग्णांची नोंद झाल्यानंतर, नाशिक महापालिकेने (NMC) डासांच्या उत्पत्तीसाठी जबाबदार असलेल्यांविरुद्धची मोहीम तीव्र केली आहे. तसेच नाशिक महापालिकेने शहरातील डास उत्पत्तीची ठिकाणे ओळखून नष्ट करण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर वाढती रुग्णसंख्येची गंभीर दखल घेत, शहरात डास उत्पत्तीची ठिकाणे निर्माण होण्यास जबाबदार असलेल्या शहरवासीयांवर महापालिकेने दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. नागरी संस्थेने अलीकडेच हॉटेल मालक आणि दोन रहिवाशांकडून एकूण 1,400 रुपये दंड वसूल केला.
सातपूर विभागात असलेल्या एका हॉटेलच्या आवारात डासांची उत्पत्तीची पाच ठिकाणे आढळून आल्याने त्यांनी हॉटेल मालकाला एक हजार रुपयांचा दंड ठोठावला असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. शिवाय, त्यांनी महापालिकेच्या नाशिक पूर्व विभागातील दोन शहरातील रहिवाशांना त्यांच्या घराच्या आवारात डासांची उत्पत्तीची ठिकाणे आढळून आल्याने त्यांना प्रत्येकी 200 रुपयांचा दंडही ठोठावला.
नाशिक महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ऑक्टोबरमध्ये नोंदवण्यात आलेल्या डेंग्यूच्या रुग्णांची संख्या चालू वर्षातील आतापर्यंतची सर्वाधिक आहे. जानेवारीपासून शहरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या 526 वर पोहोचली आहे, परंतु अद्याप एकही मृत्यू झालेला नाही.
पुढील आठवड्यापासून रुग्णसंख्येत होणार घट..
गेल्या महिन्यात अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे शहरात डासांची उत्पत्ती होण्याची ठिकाणे निर्माण झाल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. “परंतु पुढील आठवड्यापासून केसेस कमी होण्यास सुरुवात होईल कारण पाऊस थांबल्यामुळे नवीन प्रजनन स्थळे निर्माण होणार नाहीत,” असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.