नाशिकमध्ये पोटनिवडणुकीत भाजपची सरशी, मनसेचा दारुण पराभव
एबीपी माझा वेब टीम | 29 Aug 2016 04:04 PM (IST)
नाशिक: नाशिक महापालिकेच्या दोन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपनं विजयी पताका फडकवली आहे. तडीपार म्हणून घोषित करण्यात आलेला गुंड पवन पवारचा पक्षप्रवेश भाजपच्या पथ्यावर पडलेला दिसतो आहे. भाजपची साधी शाखाही नसलेल्या प्रभाग क्रमांक 35 ब आणि 36 ब मध्ये भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपाच्या मंदा ढिकले 198 मतांनी विजयी झाल्या आहेत. त्यांनी शिवसेनेच्या डॉ.वृषाली नाठे यांचा पराभव केला. दुसरीकडे प्रभाग 36 ब मध्ये भाजपाच्याच सुनंदा मोरे विजयी झाल्या असून त्यांनी शिवसेनेच्या सुनील शेलार यांचा 491 मतांनी पराभव केला आहे. विशेष म्हणजे कधीकाळी मनसेचे नगरसेवक असलेल्या या प्रभागांमध्ये मनसेला 1 हजार मतंही मिळू शकलेली नाहीत.