नाशिक : नाशिक शहरातील बससेवा आणखी काही काळ बंद ठेवण्यात येणार आहे. रविवारपासून जिल्ह्यात असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.


नाशकातील इंटरनेट सेवाही आणखी तीन दिवस बंद राहणार आहे. पोलिस आयुक्त रविंद्र सिंघल यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. इंटरनेटसोबतच बिअर बार, दारुची दुकानंही आणखी तीन दिवस बंद राहतील.

एसटीची नाशिकहून मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. मंगळवारी रात्री नाशिकमध्ये एसटी बसचं नुकसान झाल्यामुळे एसटी व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला आहे. धुळे विभागाच्या चार बसचं नुकसान झालं होतं.

रविवारी नाशिकच्या तळेगावात चिमुकलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्यानंतर जिल्ह्यात तणावाचं वातावरण होतं. तसंच या घटनेबाबत सोशल मीडियावर अनेक अफवा पसरवल्या जात असल्याने नाशिकमधील मोबाईल इंटरनेट सेवा काही काळासाठी बंद करण्यात आली होती. त्यानंतर सुरु करण्यात आलेली सेवा आता पुन्हा बंद केली आहे. मोबाईलवरुन मोठ्या प्रमाणात अफवाचं पीक पसरत असल्यामुळे नाशिक प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्रात पहिल्यांदाच इंटरनेट सेवा बंद

मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्याची महाराष्ट्रातील ही पहिलीच वेळ होती. यापूर्वी जम्मू-काश्मीर, गुजरातमध्ये इंटरनेट सेवा बंद केली होती. बुरहान वाणीच्या खात्म्यानंतर काश्मीर खोऱ्यात उसळलेल्या दंगलीनंतर काश्मीरमधील इंटरनेट सेवा बंद होती. तर गुजरातमध्ये हार्दिक पटेलच्या नेतृत्त्वातील पटेल आंदोलदरम्यान इंटरनेट सेवा ठप्प होती.