नाशिक भाजपच्या जुगारी नगरसेवकावर तडीपारीचा प्रस्ताव
प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक | 19 Nov 2018 03:48 PM (IST)
काही महिन्यांपूर्वी हेमंत शेट्टी हा एका हत्येच्या गुन्ह्यात जामिनावर बाहेर आला असून त्याच्यावर अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
नाशिक : 'पार्टी विथ डिफरन्स' म्हणवणाऱ्या भाजपचा नाशिकमधील जुगारी नगरसेवक हेमंत अण्णा शेट्टी अद्याप फरार आहे. पोलिसांनी त्याच्याविरोधात आता शासनाकडे तडीपारीचा प्रस्ताव पाठवला आहे. हेमंत शेट्टीवर विविध पोलिस ठाण्यात हत्येसह एकूण नऊ गुन्हे दाखल आहेत. गेल्या सोमवारी हेमंत अण्णा शेट्टी सात साथीदारांसह 52 पानी पत्त्यांच्या कॅटवर पैसे लावून 'अंदर बाहर' नावाचा जुगार खेळत होता. पंचवटीतील वाल्मिकनगर या त्याच्याच प्रभागातील मोकळ्या जागी एका झाडाखाली हा प्रकार सुरु होता. गुन्हे शाखा एकच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकला, मात्र हे बघताच शेट्टी आणि त्याच्या दोन मित्रांनी तिथून पळ काढला. जुगार अधिनियम कायद्याअंतर्गत या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. काही महिन्यांपूर्वी हेमंत शेट्टी हा एका हत्येच्या गुन्ह्यात जामिनावर बाहेर आला असून त्याच्यावर अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. पोलिस हेमंत शेट्टीच्या मागावर आहेत.