नाशिक : नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बर्ड्याची वाडी गावातील पाणी टंचाईचे भीषण वास्तव 'एबीपी माझा'ने जगाला दाखवल्यानंतर सरकारी यंत्रणेला खडबडून जाग आली होती. आता बर्ड्याच्या वाडीच्या विहिरींची चर्चा जिल्हा प्रशासनाच्या बैठकीतही चर्चा झाली आहे.


दुष्काळ संदर्भात आयोजित आयोजित केलेल्या बैठकीत बर्ड्याच्या वाडीच्या पाणी टंचाईवरही चर्चा झाली. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. महिलांना पुन्हा विहिरीत उतरण्याची वेळ येऊ देऊ नका अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.


बर्ड्याची वाडीसारखी परिस्थिती आणखी ज्या ठिकाणी आहे, त्या प्रत्येक गावात पाण्याच्या टाक्या पोहचविण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहे. उद्या दुपारपर्यंत टाक्या गावात पोहचविण्याचा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बीडीओंना सूचना दिल्या आहेत.


एबीपी माझाच्या वृत्तानंतर काही दिवसांपूर्वी बर्ड्याची वाडी गावातील साडेतीन वर्षापासून बंद असलेली जलवाहिनी दुरुस्त करण्यात आली होती. त्यामुळे आता गावातील पाणी पुरवठा योजना सुरुळीत झाली. गावातील टँकरच्या फेऱ्या वाढल्या असून दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था मदतीसाठी पुढे येत आहेत.


कुणी टँकरचे पाणी देतंय तर कोणी महिलांना विहिरीत उतरण्याची गरज पडू नये म्हणून पाण्याच्या टाक्या भेट देत आहेत. महिलांना घराजवळ नळातून पाणी मिळू लागलं आहे. टँकरचं पाणी विहिरीत किंवा पाण्याच्या टाक्यांमध्ये टाकले जात असून त्यातून जलवाहिनीच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात आहे.


बर्ड्याची वाडी गावातील महिलांना थेंबभर पाण्यासाठी 60 ते 70 फूट खोल विहिरीत उतरुन पाणी भरावं लागत असल्याचं वृत्त एबीपी माझाने काही दिवसांपूर्वी प्रसारित केलं होते. पाण्यासाठी महिलांचा जीवघेणा संघर्ष बघून संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या वृत्तानंतर इथे सकारात्मक बदल घडू लागले आहेत.