नाशिक : नाशिक पोलीस मधुमेह मुक्त व्हावे सोबतच त्यांचा लठ्ठपणाही कमी व्हावा यासाठी आता डॉक्टर जगन्नाथ दीक्षित यांनी पुढाकार घेतला असून महाराष्ट्रातील पोलिसांसाठी त्यांचा हा पहिला उपक्रम आहे. पोलीस दल निरोगी राहिला तर नागरिकांची सुरक्षा ते अधिक चांगली करू शकतील या भावनेने त्यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे.




यासाठी नाशिक पोलीस आयुक्त कार्यालयात उपचार तसेच मार्गदर्शनासाठी लवकरच केंद्र स्थापन केले जाणार आहे. पोलिसांसाठी 'दीक्षित डाएट प्लॅन' तयार करण्यात आला असून सुरुवातीला शहरातील साडेतीन हजार पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांची स्क्रीनिंग केली जाणार आहे. त्यानंतर त्यांना योग्य तो सल्ला देण्यात येणार आहे.

पुढील एक वर्षात नाशिक पोलिसांचा मधुमेह 50 टक्के कमी करण्याचा आमचा मानस असून नाशिकनंतर महाराष्ट्रभर आम्ही हे कार्य हाती घेणार असल्याचं डॉक्टर दीक्षित यांनी यावेळी सांगितलं. विशेष म्हणजे डॉक्टर दीक्षित यांना इंडियन मेडिकल असोसिएशन आणि फिजिशियन असोसिएशनची देखील यासाठी मदत मिळणार आहे.

18 वर्षांखालील लहान मुलांसाठी 'दीक्षित डाएट'

नुकतेच मुलांमध्ये वाढता लठ्ठपणा, आळस याबाबतच्या तक्रारी वाढू लागल्यामुळे डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी लहानग्यांसाठीही नवीन प्लॅन तयार केला आहे. दीक्षित यांनी 18 वर्षांखालील मुलांसाठी कोणताही डाएट प्लॅन तयार केला नव्हता. 18 वर्षांखालील मुलांनी दिवसातून चार वेळा जेवण करावं आणि गोड कमी खावं, असा सल्ला दीक्षितांनी दिला आहे. मुलांमध्ये आरोग्याच्या समस्या वाढल्यामुळे दीक्षितांनी हा नवीन प्लॅन तयार केला.

सध्या उन्हाळ्याचे दिवस असून अनेक जण कोल्ड्रिंक्स पिण्याला अधिक पसंती देत असतात. मात्र हेच कोल्ड्रिंक्स आरोग्याला घातक आहे. त्यामुळे कोणीही कोल्ड्रिंक्स अजिबात पिऊ नका, असा सल्ला जगन्नाथ दीक्षित यांनी नाशिकमध्ये दिला होता.

माझा कट्टा | डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्यासोबत आरोग्यदायी डाएटकट्टा


लातूरच्या डॉ. जगन्नाथ दीक्षित यांना राज्य सरकारने स्थूलता नियंत्रण मोहिमेचे ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केलं आहे. 'एबीपी माझा'च्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमात दीक्षितांनी सांगितलेली स्वास्थ्यशैली जनमानसात लोकप्रिय झाल्यावर अनेक जणांनी त्याचं अनुकरण सुरु केलं.

डॉ. दीक्षित हे लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रोगप्रतिबंधक आणि सामाजिक शास्त्र विभागाचे विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. स्थूलतेचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या शासनाच्या मोहिमेअंतर्गत डॉ. दीक्षित यांच्या ज्ञानाचा उपयोग सामान्य जनतेला होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

हेल्थ टिप्स

शारीरिक स्वास्थ्याचं आहाराशी असलेल्या नात्याबाबत संशोधन करुन डॉ. दीक्षित यांनी स्वत:ची पद्धत विकसित केली. डॉ. दीक्षित यांनी विकसित केलेल्या उपचार पद्धतीने फक्त भारतातीलच नव्हे, तर परदेशातील रुग्णांनाही फायदा झाला आहे. सोशल मीडियावरही डॉक्टरांनी सांगितलेल्या स्वास्थ्यशैलीचा प्रचार होत असून 'दीक्षित डाएट प्लॅन' नावाने ती प्रसिद्ध झाली आहे.