दोन चिमुकले झोपलेल्या मच्छरदाणीत घुसून बिबट्याची विश्रांती
प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक | 14 Aug 2018 12:59 PM (IST)
या बछड्याने बराचवेळ चिमुकल्यांसोबत मच्छरदाणीत विश्रांती घेतली.
नाशिक: दोन लहान चिमुरड्यांसोबत मच्छरदाणीत चक्क एका बिबट्याचं पिल्लू येऊन गाढ झोपलं. या बछड्याने बराचवेळ चिमुकल्यांसोबत मच्छरदाणीत विश्रांती घेतली. नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी तालुक्यात धामणगाव इथं ही अनोखी घटना घडली. महत्वाचं म्हणजे बिबट्याच्या पिल्लानं बाळांना कोणतीही इजा केली नाही. मनिषा बर्डे या आदिवासी महिलेच्या घरात हा प्रकार घडला. जेव्हा या मुलांच्या आईला ही गोष्ट लक्षात आली. तेव्हा आईनं आपल्या दोन्ही बाळांना अलगदपणे बाहेर काढलं. आणि घराबाहेर जाऊन आपल्या दाराची कडी लावून घेतली. यानंतर वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी आले आणि त्यांनी बिबट्याच्या बछड्याला आपल्या ताब्यात घेतलं. या अनोख्या झोपेच्या घटनेमुळे अख्ख्या पंचक्रोशीतल्या लोकांची मात्र झोप उडाल्याचं दिसत होतं.