नाशिक : नाशिक महानगरपालिकेत बोगस नोकरभरतीचे रॅकेट कार्यरत असून शिपायाच्या माध्यमातून बेरोजगारांना गंडा घातला जात असल्याचे उघडकीस आलं आहे. या प्रकरणाची मनपा आयुक्तांनी गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.
नाशिक महापालिकेत कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. गेल्या अनेक वर्षापासून भरती प्रक्रिया राबवलेली नाही. जवळपास 14 हजार पदे रिक्त आहेत.
गेल्या दोन-तीन वर्षांपासून नोकर भारती होणार अशा चर्चंना उधाण आलं होतं. त्याचाच फायदा घेत महापालिकेच्या झोपडपट्टी पुनर्वसन विभागातील एका शिपायाने बेरोजगारांना बनावट नियुक्ती पत्र देऊन कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचं उघडकीस आलं आहे.
तत्कालीन मनापा आयुक्त आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या काळात शिपायाकडून ही फसवणूक झाल्याच उघडकीस आलं. 25 ते ३० जणांना शिपाई, कनिष्ठ लिपिक अशा विविध पदांची बनावट नियुक्ती पत्र दिल्याची चर्चा असून पुरावे सादर करण्याचे आदेश मनपा आयुक्तांनी दिले आहेत. त्याच बरोबर चौकशीसाठी संबधित शिपाईला हजर राहण्याचे फर्मान सोडण्यात आले होते. मात्र कारवाईच्या भीतीने तो फरार आहे.