नाशिक : नाशिकमधील कॉंग्रेसचे माजी नगरसेवक सुरेश दलोड यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. हा प्रकार परिसरातीलच सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलिसांनी तिघा आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

नाशकातील द्वारका परिसरात असलेल्या दलोड यांच्या कार्यालयाजवळ शनिवारी रात्री पप्पू तसंबड, पिंटू तसंबड आणि सोनू साळवे या तिघांनी दलोड यांच्यावर चॉपर आणि लाकडी दंडक्याने हल्ला चढवला होता. विशेष म्हणजे त्यांना वाचवण्यासाठी मध्ये पडलेला त्यांचा मुलगा सिद्धार्थ आणि भाच्यालाही त्यांनी मारहाण केली होती.

या घटनेत सुरेश दलोड हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी तपासाची चक्रं फिरवत या तिघांच्याही मुसकया आवळल्या.

नाशकातील मुंबई नाका पोलिस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचे पडसाद भद्रकाली परिसरात उमटले आहेत. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाला असून यामागे आणखी काही कारणं आहेत का, याचा पोलिस सध्या शोध घेत आहेत.