नाशिक : वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यांवर आता सर्वोच्च न्यायालयाची नजर पडली आहे. वाहतुकीचे नियम पायदळी तुडवणाऱ्या आणि वाहन चालवताना मोबाईलवर बोलणाऱ्यांना आता मोठी किंमत मोजावी लागणार आहे. कारण त्यांचा परवानाच निलंबित होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नाशिकमध्ये धडक कारवाईला सुरुवात झाली आहे. नाशकात गेल्या 2 दिवसात 40 वाहन चालकांचे परवाने जमा करण्यात आले आहेत. त्यापैकी चौघांचे परवाने 3 महिन्यासाठी निलंबित करण्यात आले आहेत.

आम्ही आणि आरटीओनं ही कारवाई सुरु केली आहे. नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना बुधवारी आणि शनिवारी कार्यालयात बोलावलं जातं आणि सुनावणीनंतर निलंबनाची करण्यात येते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

वाहन चालवताना मोबाईलवर बोलणं तसंच कानात हेडफोन लावून गाणी ऐकणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. विशेष म्हणजे कॉलेजच्या तरुणांसह महिलांही इथं मागे नाहीत.

वारंवार सांगूनही दुर्लक्ष करणाऱ्या वाहन चालकांचा पाठलाग करुन जोरात कारवाई सुरु आहे. मोबाईलमुळे अपघातात जीव जाणाऱ्यांची संख्या चिंताजनक आहे. आपला परवाना एकदा निलंबित झाल्यानंतर पुन्हा मिळेलही, पण आयुष्य पुन्हा मिळणार नाही. त्यामुळे वाहतुकीचे नियम पाळा आणि वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे टाळा