नाशिक : राज्याच्या आरोग्य व्यवस्थेला शरमेनं मान खाली घालायला लावणारी घटना नाशिकमध्ये घडलं आहे.
देशातील सर्वाधिक नवजात अर्भक मृत्यूचं प्रमाण असलेलं रुग्णालय म्हणून नाशिक जिल्हा रुग्णालय बदनाम झालं आहे. गेल्या पाच महिन्यात तब्बल 187 बालकांना प्राण गमवावे लागले आहेत.
देशात नवजात अर्भकांच्या मृत्यूचं प्रमाण दर हजारी 40 असताना नाशिक जिल्हा रुग्णालयात मात्र हे प्रमाण दीडशेवर गेलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे इथल्या अतिदक्षता विभागातील एका इनक्युबेटरमध्ये तीन ते चार बाळांना अक्षरश: दाटीवाटीनं कोंबून ठेवलं जातं.
ज्या अतिदक्षता विभागाची क्षमता 18 बालकं ठेवण्याची आहे, तिथं तब्बल 52 बालकांवर उपचार सुरु आहेत. लाखो रुपये खर्च करुन खाजगी रुग्णालयात मुलांवर उपचार करणं शक्य होत नसल्यामुळे नाइलाजाने चिमुकल्यांना मरणाच्या दारात उभं करावं लागतं.
नाशिक जिल्हा रुग्णालयात 5 महिन्यात 187 बालकांचा मृत्यू झाला. एप्रिल महिन्यात 32, मे महिन्यात 39, जून महिन्यात 25, जुलै महिन्यात 36 तर ऑगस्ट महिन्यात तब्बल 55 बालकं दगावली.
खरंतर जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाचा विस्तार करण्यासाठी 21 कोटींचा निधी वर्षभरापासून पडून आहे. मात्र झाडं तोडण्याची परवानगी नसल्यानं काम रखडलं आहे.
यूपीनं वर्षात हजारभर मुलांचं मरण बघितलं. फरुखाबादमध्येही कोवळ्या जीवांचा बळी गेला. मीडियानं दोन दिवस घसा ताणला, पण पुढे काहीच झालं नाही. इकडं फडणवीसांच्या राज्यातही 5 महिन्यात 187 मुलं दगावली.
समृद्धी महामार्ग, स्मार्ट सिटी, मेट्रोच्या आणि महाराष्ट्राला नंबर वन बनवण्याच्या थापा मारणाऱ्यांनी एकदा या 187 चिमुकल्यांच्या आई-बाबांच्या डोळ्यात डोळे घालून विकासाची भाषा करुन दाखवावी.