नाशिक : नाशिकमधील मोंढेवस्ती परिसरात बेवारस स्थितीत स्फोटकं सापडल्याने खळबळ उडाली आहे. एका गोणीत असलेल्या 60 जिलेटीनच्या कांड्या आणि 16 डेटोनेटर पोलिसांनी जप्त केले आहेत. पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पाथर्डी गाव-गौळाणे रस्त्यावर असलेल्या मोंढेवस्तीत बेवारस स्थितीत एका गोणीत स्फोटकं असल्याचा फोन कॉल सोमवारी रात्री इंदिरानगर पोलिस ठाण्यात आला होता. गस्तीपथकातील पोलीस व्हॅनने घटनास्थळी धाव घेतली असता तिथे जिलेटीनच्या कांड्या, डेटोनेटर्स असल्याचं लक्षात आलं.

यानंतर बीडीडीएसच्या पथकाला तत्काळ पाचारण करण्यात आलं. पथकाने ही सारी स्फोटकं जप्त केली आहेत. जिलेटीनच्या कांड्या आणि डेटोनेटर्सवरच्या मार्किंगवरुन पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

निमर्नुष्य अशा ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणावर ही स्फोटकं कुणी आणि का आणून ठेवली हा प्रश्न निर्माण झाला आहे. परिसरात कुठे विहीरी खोदण्याचं काम सुरु आहे का किंवा कोणी खाणींसाठी ही स्फोटकं आणली होती का आणि आणली असेल तर ती बेवारस स्थितीत का टाकली याचा तपास पोलिस करत आहेत.