नाशिक : गोकुळ हा माझा मुलगा आहे, तो माझा बाप नाही तर मी त्याचा बाप आहे, त्यामुळे तो माझ्या शब्दाबाहेर नाही असं मोठं वक्तव्य राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांनी केलं. गोकुळची चिंता कुणीही करू नये, तो अजून आज्ञाधारक आहे असंही ते म्हणाले. नरहरी झिरवाळांचा मुलगा गोकुळ झिरवाळ (Gokul Zirwal) यांनी शरद पवार गटातून वडिलांच्या विरोधात निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावर नरहरी झिरवाळ यांनी प्रतिक्रिया दिली. 


माझी छाती फाडाल तर त्यामध्ये शरद पवारच दिसतील, पवारांनी जर संधी दिली तर मी वडिलांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवणार असं वक्तव्य गोकुळ झिरवाळ यांनी केलं होतं. त्यावर बोलताना नरहरी झिरवाळ म्हणाले की, गोकुळ फक्त त्या ठिकाणी सत्कार करायला गेला होता आणि त्याची उमेदवारी जाहीर केली. त्याची मी समज घातलीय. अजून तो आज्ञाधारक आहे, मी सुद्धा आज्ञाधारक. गोकुळची चिंता तुम्ही करू नका. माझ्या शब्दाबाहेर जाणार नाही. 


शरद पवारांच्या स्टेजवर गेल्यानंतर गोकुळने कुठेच वावगा शब्द काढला नाही, त्याने चांगलं बोललं त्याचा अभिमान असल्याचं नरहरी झिरवाळ म्हणाले. 


बापच डोकेबाज आहे, पोरगा त्याच्या पुढचा


गोकुळ झिरवाळांनी निवडणुकीसंदर्भात घेतलेल्या भूमिकेवर नरहरी झिरवाळ म्हणाले की, त्याचा बापच डोकेबाज आहे, माझा पोरगा जरासा होईना वरचढ असेलच की. म्हणजे सांगायचं इकडे आणि जायचं तिकडे अशातले आम्ही आहोत. 


आपण नेहमी अजित पवारांसोबतच


काही झालं तरी आपण शेवटपर्यंत अजित पवारांसोबत राहणार असल्याचं नरहरी झिरवाळ म्हणाले. ते म्हणाले की, मी  तिसऱ्यांदा निवडून आलोय. पहिल्यापासून मी तिथेच आहे, यापुढेही तिथेच राहणार. मी शेवटपर्यंत अजितदादांसोबतच राहणार आणि त्यांच्यासोबतच निवडणूक लढवणार. 


स्थानिक उमेदवाराचा फायदा लोकसभेला झाला आणि त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराचा पराभव झाला असं नरहरी झिरवाळ म्हणाले. 


ही बातमी वाचा: