नाशिक : नाशिकमध्ये पावसाच्या पुनरागमनासोबतच साथींच्या आजारही फोफावण्यास सुरुवात झाली आहे. नाशिक शहरात डेंग्यूच्या रुग्णाची संख्या झपाट्याने वाढते आहे. दिवसाला सरासरी पाच रुग्ण आढळून येत आहेत. ऑगस्ट  महिन्यात आतापर्यंत 75 हून अधिक जणांना डेंग्यूची लागण झाली आहे.

नाशिक महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाकडून ‘स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक’चे कितीही दावे केले जात असले, तरीही शहरातील रुग्णाच्या संख्येवरुन प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभ राहत आहे. नाशिक शहरात ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत 75 हून अधिक रुग्णांना डेंग्यूची लागण झाली आहे. 8 ते 14 ऑगस्ट या कालवधीत डेंग्यूचे तब्बल 47 रुग्ण आढळून आले आहेत. जानेवारीपासून आतापर्यंत 991 डेंग्यू संशयित रुग्ण आढळून आले असून, 296 जणांना लागण झाली आहे. तर चिकनगुनियाचे आतापर्यंत 25 रुग्ण आढळून आले आहेत.

नाशिक शहरात औषध धूर फवारणी नियमितपणे केली जात नाही. जागोजागी पाण्याची डबकी, घाण अस्वच्छता बघयला मिळते आहे. त्यावर प्रतिबंध करण्याऐवजी नागरिकांवरच दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा महापालिकेकडून दिला जातो आहे. डेंग्यूची साथ फोफावत असताना देखील महापौरांनी अद्याप आरोग्य अधिकाऱ्यांची, कर्मचाऱ्यांची एकही बैठक घेतली नाही किंवा कुठल्या भागाचा पाहणी दौराही केला नाही. आरोग्य समितींची स्थापना करण्यात आलीय. मात्र तिचे कामकाजही केवळ कागदावरच आहे. त्यामुळे नागरिकांना स्वत:च्या आरोग्याची स्वत:च काळजी घेण्याची गरज आहे.

आरोग्य विभागावर महापालिकेचा लाखो रुपयांचा खर्च होतो. धूर औषध फवारणीचे ठेके दिले जातात. मात्र त्याची अंमलबजावणी होतेय का, याकडे लक्ष दिले जात नाही.

नाशिक महापालिकेत गेल्या सहा महिन्यांपासून मनपा आयुक्त आणि लोकप्रतिनिधी यांच्यात ‘तू तू मैं मैं’ आणि मानापमान नाट्य सुरु आहे. त्यात मध्येच अधिकारी-कर्मचारी बंडाचे निशाण उगारण्याचा इशारा देत आहेत. मात्र ज्या सर्वसामान्य नागरिकांसाठी हे तिन्ही घटक कार्यरत आहेत, त्यांच्या मुलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे.