मनमाड, नाशिक: ‘अरे हॉटेलवाले शिंदे कहा है, शिंदे को बुलाओ’, हे वाक्य आहे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे.
अटलबिहारी वाजपेयी मनमाड शहरात दोन वेळेस प्रचार सभेच्या निमित्ताने येऊन गेले. मनमाड शहरातील तत्कालिन जनसंघाच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. शहरातील हॉटेल विसावाचे मालक आणि जनसंघाचे तत्कालिन जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव शिंदे यांच्याशी त्यांचे विशेष स्नेहाचे नाते होते.
त्यांची ओळख हॉटेलवाले शिंदे या नावाने झाल्याने, वाजपेयी जेव्हा पण नाशिकला येत, तेव्हा ते ‘हॉटेलवाले शिंदे कहा है, बुलाओ उनको’ असं म्हणत.
अहमदाबाद येथील अधिवेशनात संतती नियमनाचा ठराव आल्यानंतर कोणीही त्याबद्दल बोलले नाही. मात्र मी उठून त्याला अनुमोदन दिले, तेव्हा अटलजी म्हणाले कोई एक तो है जो इसके बाजूसे बोला, अशी आठवण लक्ष्मणराव शिंदे यांनी सांगितली.
वाजपेयींच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार
देशाचे माजी पंतप्रधान, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. नवी दिल्लीतील राष्ट्रीय स्मृती या ठिकाणी अटलजींवर अंत्यसंस्कार होतील.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं गुरुवारी 16 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5 वाजून 5 मिनिटांनी निधन झालं. ते 93 वर्षांचे होते. त्यांच्या निधनानं भारतीय राजकारणातला भीष्म पितामह हरपला आहे. वाजपेयींच्या निधनाने संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. काल संध्याकाळी अटलजींचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी ठेवण्यात आलं.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील दिग्गज नेत्यांनी त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. दुपारी 4 वाजता राष्ट्रीय स्मृतीस्थळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. वाजपेयी यांच्या निधनामुळं देशात 7 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या
अटलअस्त! वाजपेयींच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार
वाजपेयी म्हणाले होते 'राजीव गांधींमुळे मी जिवंत!'
'मेरे अटल जी', मोदींच्या ब्लॉगचं मराठी भाषांतर
पाकिस्तान दौऱ्यापूर्वी वाजपेयींनी गांगुलीला 'हे' गाणं ऐकवलं