नाशिकमध्ये मिनी बसला आग, सुदैवाने 10 जण बचावले!
प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक | 20 May 2017 09:37 PM (IST)
नाशिक : नाशिकमधील वर्दळीचं ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या द्वारका परिसरात रात्री 8 वाजण्याच्या सुमारास एका चालत्या मिनी बसने अचानक पेट घेतल्याने परिसरात एकच धावपळ उडाली होती. मिनी बसमधील प्रवासी अहमदाबादचे सोनी नामक कुटुंब असून शनिशिंगनापूरला दर्शन घेऊन ते त्र्यंबकेश्वरला जात असताना नाशिकमध्ये येताच द्वारका परिसरात अचानक गाडीतून धूर निघू लागला. हे बघताच चालकाने प्रसंगावधान दाखवत गाडी थांबविली आणि गाडीतिल 5 महिलांसह 2 पुरुष आणि 3 लहान मुलांना सुखरूप बाहेर काढले. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि आग आटोक्यात आणली. मात्र, वाहन जवळपास पूर्णपणे जळून खाक झाले. ऐन वर्दळीच्या वेळी ही घटना घडल्याने काही काळ वाहतूक कोंडी देखील निर्माण झाली होती.