नाशिक : मी स्वतः आणि सरकार दोघेही मराठा समाजासोबत आहे. काही लोक ओबीसी आणि मराठा समाजामध्ये वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, ते योग्य नसल्याचंही नाशिकचे पालकमंत्री छनग भुजबळ म्हणाले. आज नाशकात मराठा समाजाच्या मूक आंदोलन पार पडलं. या आंदोलनाला हजेरी लावण्यासाठी छगन भुजबळ नाशकात उपस्थित होते. त्यावेळी मराठा आंदोलकांना संबोधित करताना छगन भुजबळ बोलत होते. 


छगन भुजबळ म्हणाले की, "नाशिकमध्ये होणाऱ्या मूक आंदोलनाबाबत खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासोबत बोलणं झालं आणि मी त्यांना ताबडतोब सांगितलं मी येणार. मराठा समाजाला हक्काचं आरक्षण मिळालं पाहिजे याबाबत कोणाच्याही मनात दुमत नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आमच्या पक्षाची भूमिका आहे, तसेच इतर पक्षांचीही हीच भूमिका आहे, या भूमिकेशी मी देखील एकनिष्ठ आहे. 


"काही लोकांचं म्हणणं आहे की, ओबीसींचे आक्रोश मोर्चे सुरु झाले, ते मराठा समाजाच्या आंदोलनाला विरोध करण्यासाठी आहे, असं अजिबात नाही. मराठा समाजाला विरोध करण्यासाठी ओबीसींचा आक्रोश मोर्चा नाही. मराठा आणि ओबीसी समाज अडचणीत आहे. मराठा समाजाचं आरक्षण सुप्रीम कोर्टानं नाकारलं आणि ओबीसींच्या असलेल्या आरक्षणावरही गदा आणली. कायद्याच्या कचाट्याट सापडल्यावर या अडचणी निर्माण होतात, त्यामुळे ओबीसी समाजाचं म्हणणं आहे की, आमचं आरक्षण वाचवा. पण काहीजण दोन्ही समाजात वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, हे बरं नाही", असं छगन भुजबळ म्हणाले. 


"आपलं उद्दिष्ट एकमेकांसोबत भांडण्याचं नाही. तर आपलं उद्दिष्ट राज्य सरकारला घेऊन, केंद्र सरकारला बरोबर घेऊन आपल्या मागण्या मान्य करुन घेणं आहे. मराठा, ओबीसी आरक्षणासाठी कोर्टात लढताना केंद्र सरकारची नितांत गरज आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठीही केंद्राची गरज आहे आणि ओबीसी आरक्षणासाठीही आहे. आपण एकत्र येऊन लढण्याची गरज आहे.", असं छगन भुजबळ म्हणाले. 


पाहा व्हिडीओ : Maratha Reservation Protest Nashik : मराठा-ओबीसी समाजामध्ये वितुष्ट नको ; छगन भुजबळ



"आमच्याबाबतीत वेगळीच परिस्थिती आहे. इतर वेळा सगळं व्यवस्थित करतो. पण निवडणुका आल्या की जात. मी शाहू-फुले-आंबेडकरांचा पायिक आहे. त्यामुळे मी कधीही जात बघितली नाही. कुणीही सांगावं की मी मराठा आरक्षणाचा विषय आला आणि मी विरोध केला. पण, काही जण मला विरोधक असल्याचं सांगत असतात. मराठा समाजाला आरक्षण देणं महत्त्वाचं की छगन भुजबळांवर टीका करणं महत्त्वाचं. संभाजीराजेंनी सगळ्यांना सोबत घेण्याची भूमिका घेतली. आपला लढा व्यवस्थेशी आहे. आतापर्यंत ज्या चर्चा झाल्या. जे प्रस्ताव मांडले गेले, ते सरकारने तातडीने मंजूर करण्यात आले. यापुढेही असंच धोरण सरकारचं असेल. चर्चेशिवाय मार्ग नाही. चर्चा करून कोर्टात जावं लागेल. मी तुमच्याबरोबर आहे." तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, "मी कधीही विरुद्ध गेलो, तर ताबडतोब प्रश्न विचारा भुजबळ तुम्ही आमच्या विरुद्ध का? कुणाच्याही आरक्षणाला धक्का लागता कामा नये. सर्वांशी माझी बांधलकी आहे."