नाशिक : रेल्वेतील प्रवाशांसाठी लढणाऱ्या बिपीन गांधी यांचा रेल्वेस्थानकावरच मृत्यू झाला. नाशिक रोड रेल्वेस्थानकावर बिपीन गांधी यांना हृदयविकाराचा धक्का बसला आणि तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली.


बिपीन गांधी हे रेल परिषदेचे अध्यक्ष होते. पंचवटी एक्स्प्रेस आणि नाशिक-मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोई-सुविधांसाठी बिपीन गांधी झटत होते. शेवटच्या श्वासापर्यंत ते प्रवाशांसाठी लढत राहिले.

अत्यंत सकारात्मक विचारांचा माणूस म्हणून बिपीन गांधी यांच्याकडे पाहिले जात असे.

गेल्या अनेक वर्षांपासून आदर्श बोगी मंजूर करण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. त्यानंतर आदर्श बोगीची लिम्का बुकमध्ये नोंद व्हावी म्हणूनही त्यांनी प्रयत्न केले.

अत्याधुनिक सुविधांसह पंचवटी एक्स्प्रेस पहिल्यांदा नाशिक रोड रेल्वेस्थानकावर येणार होती आणि दुर्दैवी म्हणजे त्याआधीच बिपीन गांधी यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

बिपीन गांधी यांनी पंचवटी एक्स्प्रेसवरच एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली होती. ही प्रतिक्रिया दिल्यानंतर काही मिनिटातच त्यांनी प्राण सोडले.

रेल्वे आणि रेल्वे प्रवाशांसाठी लढणाऱ्या बिपीन गांधी यांचं निधन काळजाला चटका लावणारं आहे.