आंघोळ करताना शॉवरमधून करंट, डॉक्टरचा जागीच मृत्यू
प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक | 16 Jan 2018 09:17 AM (IST)
डॉ. काकडे यांच्या अंगावर भाजलेल्याचे व्रण होते. मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. शॉक लागून मृत्यू झाल्याचं शवविच्छेदन अहवालात उघड झालं.
नाशिक : आंघोळ करताना शॉवरमध्ये करंट उतरुन शॉक लागल्याने नाशिकमधील डॉक्टरचा मृत्यू झाला. डॉ. आशिष काकडे असे मृत डॉक्टरचे नाव आहे. गंगापूर रोडवरील इंद्रप्रस्थ सोसायटीमध्ये राहणाऱ्या डॉ. आशिष काकडे यांच्या घरातून दुपारच्या सुमारास बाहेर पाणी येत असल्याचं सोसायटीतील रहिवाशांच्या लक्षात आलं. त्यांनी घरात जाऊन बघितले असता, डॉ. काकडे बाथरुममध्ये मृतावस्थेत आढळून आले. त्यांनी सरकारवाडा पोलिसांना याबाबत माहिती दिली. डॉ. काकडे यांच्या अंगावर भाजलेल्याचे व्रण होते. मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. शॉक लागून मृत्यू झाल्याचं शवविच्छेदन अहवालात उघड झालं. डॉ. काकडे हे नाशिकच्या मोतिवाला महाविद्यालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टर म्हणून कार्यरत होते. मूळचे ते तळोदा येथील असून, तळोद्याला त्यांचे आई वडील दोघेही डॉक्टर आहेत.