नाशिक: यंदाच्या महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जासोबत शौचालयाचा दाखला देण्याचा नियम महिलां उमेदवारांसाठी कुचंबणेचा विषय ठरला आहे. या दाखल्यासाठी स्वत:चा शौचायलासोबतचा फोटो जोडावा लागत असल्यामुळं महिला नेत्या संतप्त झाल्या आहेत.

निवडणूक लढायची असेल, तर उमेदवारांना यापुर्वी फक्त थकबाकी आणि चारित्र्य पडताळणी दाखला द्यावा लागत असे. पण यंदा 'स्वच्छ भारत' अभियानाचा भाग म्हणून महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांना इतर दाखल्यांसोबत शौचालयचा दाखला देणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

हा दाखला मिळवण्यासाठी एकट्या नाशिक शहरात दीड हजारावर इच्छुक उमेदवारांनी महापालिकेकडे अर्ज केले आहेत. पण हा अर्ज मिळवण्यासाठी शौचायलासोबतचा फोटो जोडावा लागत असल्यानं, महिला नेत्या संतप्त झाल्या आहेत. निवडणूक आयोगानं महिलांची लाज काढली, अशी संतप्त प्रतिक्रिया महिला उमेदवारांमधून व्यक्त होत आहे.