नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या स्वागताचे बॅनर फाडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात हा वाद चिघळण्याची शक्यता आहे.  नाशिकमधील येवल्यात ही घटना घडली आहे. 


शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रथमच नाशिक दौऱ्यावर येत आहेत. मालेगाव  तालुक्यात विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. महत्वाचे म्हणजे शिंदे गटात सामील झालेल्या दादा भुसे, सुहास कांदे यांच्या पाठबळासाठी हा दौरा असल्याचे सांगितले जात आहे. अशातच येवला तालुक्यातील विंचूर चौफुलीवर शिंदे समर्थकांकडून मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी बॅनर लावण्यात आले होते. हे बॅनर अज्ञाताकडून फाडण्यात आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.


दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मालेगाव येथील नियोजित कार्यक्रम आटोपून वैजापूर येथे जाणार आहेत. त्याआधी ते येवला येथे समर्थकांच्या गाठीभेटी घेण्यासाठी काही काळ थांबणार आहेत. या पार्श्वभूमीवर येवल्यातील  शिंदे समर्थकांनी त्यांच्या स्वागताचे बॅनर विंचूर चौफुली व फत्तेबुरुज नाका भागात लावले होते. मात्र दौऱ्याच्या एक दिवस आधीच कोणीतरी बॅनर  फाडल्यामुळे येवल्यातील वातावरण तापले होते. 


याबाबत स्थानिक पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर तत्काळ नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना सूचना देऊन बॅनर उतरवून घेण्यात आले. या प्रकरणी बॅनर फाडणाऱ्या अज्ञातांवर कारवाईची मागणी शिंदे समर्थकांनी शहर पोलिसांकडे केली आहे. याबाबत समर्थकानी एकत्र येवून येवला शहर पोलिसांना लेखी निवेदन दिले आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांसाठी नाशिक आणि औरंगाबाद जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. परंतु, या दौऱ्यादरम्यानच हे कृत्य केल्यामुळे नाशिकमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. 


असा असेल मुख्यमंत्र्यांचा नाशिक दौरा


29 जुलै रोजी सोईनुसार मालेगाव (जि.नाशिक) कडे प्रयाण आणि मालेगाव येथे मुक्काम. शनिवार 30 जुलै रोजी मालेगाव येथे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विविध विकासकामांबाबत आढावा बैठक होईल. तसेच त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन होणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री औरंगाबादकडे रवाना होणार असून तेथे त्यांचा मुक्काम असणार आहे.