नाशिकमध्ये भरवस्तीत बिबट्याचा थरार, चौघांवर हल्ला
एबीपी माझा वेब टीम | 25 Jan 2019 11:49 AM (IST)
बिबट्याने फाटकाच्या मार्गानेच बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, मात्र दबा धरुन बसलेल्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला मोठ्या धाडसाने जाळ्यात पकडले. अखेर बिबट्याला पकडल्यानंतर परिसरातील नागरिकांचा जीव भांड्यात पडला.
नाशिक : नाशिकच्या सावरकरनगर भागातल्या भरवस्तीत शिरलेल्या बिबट्याला जाळ्यात पकडण्यात अखेर वनविभागाला यश आलं आहे. बिबट्याला पकडण्यासाठी सावरकरनगर परिसरात जवळपास दीड तास थरारनाट्य सुरु होतं. बिबट्या शिरल्याची माहिती मिळताच परिसरातील लोकांनी बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. गंगापूर रोडवरील सावरकरनगरच्या भरवस्तीत बिबट्या घुसला होता. माहिती कळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले होते. सावरकरनगर परिसरातील एका बंगल्याच्या फाटकावर वनविभागाचे कर्मचारी जाळे घेऊन उभे राहिले होते. यावेळी बिबट्याने फाटकाच्या मार्गानेच बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, मात्र दबा धरुन बसलेल्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला मोठ्या धाडसाने जाळ्यात पकडले. बिबट्याला पकडल्यानंतर परिसरातील नागरिकांचा जीव भांड्यात पडला. दरम्यान त्यापूर्वी बिबट्यानं केलेल्या हल्ल्यात शिवसेना नगरसेवक संतोष गायकवाड यांच्यासह एक नागरिक जखमी झाला होता. शिवाय 2 पत्रकारांवरही बिबट्यानं हल्ला केला.