नाशिक : नांदूर मध्यमेश्वरमधील पक्षी अभयारण्यातच असंख्य पक्षांचा मृत्यू झाला आहे. मासेमाऱ्यांच्या जाळ्यात अडकून पक्षांचे प्राण जात असल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी पक्षीप्रेमींनी केली आहे. दरम्यान पक्षीमित्र आणि गाईडने जाळ्यात अडकलेल्या अनेक पक्षांचे प्राण वाचविले आहेत. पक्षी संवर्धनासाठी सुरू करण्यात आलेल्या अभयारण्यातच स्थलांतरित, परदेशी दुर्मिळ प्रजातीच्या पक्षांचे जीव धोक्यात असल्याचे स्पष्ट झाले आहे. वनविभागाच्या अखत्यारीत असणाऱ्या नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यात स्थानिक मासेमारी करणाऱ्यांचे जाळे आढळले आहे. या जाळ्यात अडकून कॉमन क्रेन, डार्टर, कॉमन कूट, पान कावळे यांसह विविध प्रकारच्या बदकांचाही मृत्यू झाला आहे. या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी पक्षीप्रेमींनी केली आहे. वनविभागाने योग्य कारवाई न केल्यास पक्षीप्रेमींनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.