नाशिक: तळेगावातील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराविरोधात नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आलं होतं. या आंदोलनाला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागलं होतं. त्यामुळे अधिक अफवा पसरु नयेत यासाठी नाशिकमधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. आता तब्बल सहा दिवसानंतर आज इटरनेट सेवा सुरु करण्यात येणार आहे.
आज दुपारी १ वाजल्यापासून टप्प्याटप्प्याने इंटरनेट सेवा सुरु करण्यात येणार आहे. अफवा पसरु नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून जवळपास ६ दिवस इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. सध्या नाशिकमधली परिस्थिती पूर्णपणे निवळली आहे. त्यामुळे आता इंटरनेट सेवा सुरु करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे.
महाराष्ट्रात पहिल्यांदाच इंटरनेट सेवा बंद
दरम्यान, मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्याची महाराष्ट्रातील ही पहिलीच वेळ होती. यापूर्वी जम्मू-काश्मीर, गुजरातमध्ये इंटरनेट सेवा बंद केली होती. बुरहान वाणीच्या खात्म्यानंतर काश्मीर खोऱ्यात उसळलेल्या दंगलीनंतर काश्मीरमधील इंटरनेट सेवा बंद होती. तर गुजरातमध्ये हार्दिक पटेलच्या नेतृत्त्वातील पटेल आंदोलदरम्यान इंटरनेट सेवा ठप्प होती.