नाशिक : राज्यात एकीकडे सीबीआय आणि ईडीने कारवाई सुरु केली असताना दुसरीकडे आयकर विभागाने नाशिकमधील दहाहून अधिक कांदा व्यापाऱ्यांवर गेल्या चार दिवसांपासून धाडसत्र सुरु केलं आहे. त्यामध्ये कोट्यवधींच्या बेहिशोबी मालमत्ता जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आयकर विभागाच्या धाडीचे काही फोटो जाहीर करण्यात आले असून त्यामध्ये नोटांची थप्पी लावल्याचं दिसून येत आहे. 


आयकर विभागाने जप्त केलेली ही मालमत्ता कोट्यवधींची असून त्याचा कोणताही हिशोब या व्यापाऱ्यांकडे नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या व्यापाराच्या घरांवर, कार्यालयांवर धाडी टाकण्यात आल्या असून त्यांच्या बँक अकाऊंटचीही माहिती घेण्यात येत आहे. यामुळे पिंपळगाव तसेच नाशिक परिसरात एकच खळबळ उडाली असल्याचं चित्र आहे. 


आयकर विभागाच्या 100 हून अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी हे धाडसत्र सुरु केलं असून यामध्ये जवळपास 26 कोटी रुपयांहून अधिक कॅश आणि 100 कोटी रुपयांहून अधिक बेहिशोबी मालमत्ता सापडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जप्त केलेल्या या मालमत्तेत शंबर, दोनशे, पाचशे आणि दोन हजारांच्या नोटांचा भरणा आहे. आयकर विभागाला ही रक्कम मोजायला तब्बल एक दिवस लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 


आयकराने जप्त केलेल्या या मालमत्तेचं पुढं काय केलं जाणार, या व्यापाऱ्यावर पुढे कोणती कारवाई करण्यात येणार तसेच या व्यापाऱ्यांचे नाव जाहीर करण्यात येणार का असे अनेक प्रश्न आहेत. अद्याप आयकर विभागाकडून यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली नाही. 


 



महत्वाच्या बातम्या :