नाशिक : कर्तव्यदक्ष अधिकारी अशी ओळख असलेले नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात सत्ताधारी भाजप अविश्वास ठराव आणत आहे. मात्र भाजपच्या या प्रस्तावाविरोधात नाशिककर तीव्र संताप व्यक्त करत आहेत. तुकाराम मुंढेंनी पाठिंब्याबद्दल नागरिकांचे आभार मानले आहेत.
एबीपी माझाशी बोलताना त्यांनी अनेक प्रश्नांना उत्तरं दिली. ''माझी बदली करुन नाशिकचे प्रश्न सुटणार असतील तर नक्कीच बदली करा,'' असं ते म्हणाले. शिवाय वारंवार बदली केली जाते याचं नक्कीच वाईट वाटतं, पण निर्णय शासनाचा असतो, असंही ते म्हणाले.
''आरोप बिनबुडाचे''
''अविश्वास ठरावावर निर्णय शासनाचा असतो, पण माझ्यावर जे आरोप केले आहेत ते बिनबुडाचे आहेत. करवाढीबाबत चुकीचा संभ्रम तयार केला जातोय. 40 पैसे जी करवाढ मी केली होती ती पाच पैशांवर आणली आहे. करवाढीचं चुकीच्या पद्धतीने सादरीकरण केलं जातंय,'' असं तुकाराम मुंढे यांनी सांगितलं.
''... म्हणून रस्त्याची कामं थांबवली ''
''मी येताच ऑडिट केलं, तर शहरात जवळपास दोन लाख प्रॉपर्टी अनाधिकृत सापडल्या. 257 कोटीची रस्त्यांची कामं थांबवली आहेत. कारण, ही कामं रस्ते दुरुस्तीची आहेत. कुंभमेळ्याच्या काळात चुकीच्या पद्धतीने केलेली ही कामं आहेत. एकीकडे नाशिक महापालिकेत ज्या 22 ते 23 गावांचा समावेश केला, त्या गावांमध्ये मातीचे रस्ते आहेत आणि दुसरीकडे नव्याने केलेल्या शहरातील रस्त्यांवरच पुन्हा कोट्यवधींचा खर्च कशामुळे,'' असा सवालही तुकाराम मुंढे यांनी केला.
''नगरसेवक निधीतला एक रुपयाही खर्च होत नाही''
''नगरसेवक निधी 75 लाख होता, तो कायद्यानुसार कमी केला. बजेटच्या दोन टक्के नगरसेवक निधी असतो, तेवढाच ठेवलाय. अगोदरच्या काळात पाहिलं तर नगरसेवक निधीतला एक रुपयाही खर्च झालेला नाही. अयोग्य आणि कायद्याच्या बाहेरील गोष्ट तुम्ही माझ्याकडून अपेक्षित करत असाल तर ते होणार नाही आणि हे चुकीचं आहे का ते अविश्वास आणणाऱ्यांनाच विचारावं,'' असं तुकाराम मुंढे म्हणाले.
''माझं काम नाशिकच्या विकासासाठी चाललं आहे. त्यासाठी मला योग्य वेळ आणि निधी अपेक्षित आहे. करवाढीतून निधी जमवण्याचा प्रयत्न सुरु आहे. वेळ ही बदलीवर अवलंबून आहे, पण माझी बदली करुन प्रश्न सुटणार असतील तर नक्कीच माझी बदली करा,'' असं तुकाराम मुंढे यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या :
स्पेशल रिपोर्ट : हे फक्त तुकाराम मुंढेंच्या बाबतीतच का?
तुकाराम मुंढेंच्या समर्थनासाठी नाशिककर एकवटले
नाशिक मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंविरोधात अविश्वास प्रस्ताव
माझ्या बदलीने नाशिकचे प्रश्न सुटणार असतील तर नक्की बदली करा : तुकाराम मुंढे
प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक Updated at: 28 Aug 2018 03:04 PM (IST)